|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नळदुर्ग येथे ऐतिहासिक किल्ल्यात बोट उलटून तीन बालके ठार सहाजण बचावले

नळदुर्ग येथे ऐतिहासिक किल्ल्यात बोट उलटून तीन बालके ठार सहाजण बचावले 

प्रतिनिधी/ उस्मानाबाद

नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी आलेल्या तीन लहान पर्यटकांचा किल्ल्यात बोटींग करीत असताना पाण्यात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. घटना शुक्रवार 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता घडली आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, नळदुर्ग येथील एहसान नय्यरपाशा काझी यांनी आपल्या नातेवाईकांना किल्ला पाहण्यासाठी किल्ल्यात घेवून गेले होते. यावेळी किल्ला पाहिल्यानंतर किल्ल्यातील नदीपात्रात बोटींग करण्यासाठी गेले होते. दरम्यान बोटमध्ये बसून बोटींगचा आनंद घेताना बोटीमध्ये समोरच्या बाजूला वजन जास्त झाल्याने पाठीमागून बोट उलटली. त्यानंतर बोटीतील सर्वजण पाण्यात पडले.

बोट उलटल्याचे समजताच किल्ल्यातील उपस्थित असलेल्या कर्मचाऱयांनी तात्काळ पाण्यात उडी घेवून पाण्यात बुडत असलेल्या सात जणांना पाण्यातून बाहेर काढून त्यांचा जीव वाचविला. मात्र या दुर्घटनेत सानिया फारोक काझी (वय 7), इजान एहसान काझी (वय 5) रा. नळदुर्ग या सख्या चुलत बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर अलजाम शफीक जहागिरदार वय 12 रा. मुंबई हिला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर ती जीवंत असताना तिला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले असता ती मरण पावली.

दरम्यान या दुर्घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. यावेळी उपविभागीय दंडाधिकारी निलम बाफना यांनीही घटनास्थळी भेट देवून घटनेची पाहणी केली. या घटनेत बचावलेल्या सात जणांपैकी अलजाम शफीक जहागिदार या मुलीचा श्वासोश्वास चालू असताना तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. दरम्यान तिला या ठिकाणी अर्धा तास उपचार मिळू शकला नाही. शिवाय या रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारीही अर्धा तास उशिरा आल्यामुळे उपचार मिळू शकला नसल्याने अलजाम जहागिरदार हिचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी दोषी असणाऱया वैद्यकीय अधिकाऱयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याबाबतचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकार्यांना दिले आहे.

या घटनेची नोंद येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली असून जिल्हा आरोग्य अधिकार्यांना या घटनेची माहिती देवून संबंधित वैद्यकीय अधिकार्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप घुगे यांनी नातेवाईकांना दिले आहे. हा अपघात सकाळी 10:00 च्या सुमारास घडली असुन घटनास्थळी नगरसेवक शहबाज काझी ,मुस्ताक कुरेशी ,नय्यर पाशा जागीरदार दाखल झाले यावेळी प्राथमिक केंद्रातही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वरील काही प्रतिष्ठीत नागरीक व नगरसेवकानी शांततेचे आवाहन केले आहे. तर मयताचे वडील एहसान काझी यानी हया बोटी बरेच दिवस झाले आणले आहेत तरी बोटीच बंद करा असेही ते म्हणाले तलाठी कदम, सपोनि संजीवन मिरकले यानी वातावरण शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

Related posts: