|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » व्यवसायात ग्राहक हाच सर्वात महत्त्वाचा

व्यवसायात ग्राहक हाच सर्वात महत्त्वाचा 

 

 प्रतिनिधी / पुणे :  व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायाची काही काळाने सवय होते आणि आपल्या कामाबद्दल स्व-समाधानाची भावना बाळगण्यातच धन्यता वाटू लागते. परंतु कोणताही व्यवसाय हा ग्राहकासाठी असतो. त्याचाच हळूहळू विसर पडू लागतो. त्यामुळे आपण सातत्याने ग्राहकासाठीच काम करतो आहोत ना, याची खातरजमा प्रत्येक व्यावसायिकाने करायला हवी, असे मत प्रसिद्ध उद्योजक आणि ‘किर्लोस्कर इन्स्टिटय़ूट ऑफ ऍडव्हान्स्ड मॅनेजमेंट स्टडीज’च्या (केआयएएमएस) नियामक मंडळाचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले.

केआयएएमएस’च्या पदवीप्रदान समारंभात आज 178 विद्यर्थ्यांना पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यात संस्थेच्या पुणे आणि हरिहर (कर्नाटक) या दोन्ही ठिकाणी शिकणाऱया विद्यार्थ्यांचा समावेश होता. पुण्याजवळ धामणे येथे असलेल्या केआयएएमएसच्या संकुलात हा समारंभ पार पडला.

‘किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.’चे व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी आर. आर. देशपांडे आणि हार्बिंजर समुहाचे संस्थापक व प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. विकास जोशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. केआयएएमएसचे उपाध्यक्ष अमरशेखर भोनागिरी, संस्थेचे पुणे येथील संचालक डॉ. अमित सिन्हा, हरिहर येथील संचालक डॉ. व्ही. एस. पै या वेळी उपस्थित होते.