|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » राज ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार

राज ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार 

प्रतिनिधी/ मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात सभा घेऊन भाजप सरकारची पोलखोल करणाऱया राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे राज मुंबईत कोणता व्हिडीओ लावायला सांगणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंगळवार 23 एप्रिल रोजी राज ठाकरे यांची सभा काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात होणार आहे. मनसेने 24 एप्रिल रोजीच्या सभेसाठी मुंबई महापालिका आणि निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. मात्र, महापालिकेने या सभेची परवानगी नाकारल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर पालिकेने 24 ऐवजी 23 एप्रिलला सभेची परवानगी दिली आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत नाहीत, तरीही ते राज्यभरात दुसऱया-तिसऱया टप्प्यातील निवडणूक प्रचारात सभा घेऊन मोदी आणि शहा यांच्याविरोधात आक्रमक होत या दोन्ही नेत्यांना राजकीय क्षितीजावरुन दूर करण्याचे आवाहन करत आहे. तर, आपल्या सभांच्या वेळी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत राज यांनी राज्यात एक वेगळेच वातावरण निर्माण केले आहे. ‘ए लाव रे तो व्हिडीओ…’ या त्यांच्या वाक्याची सोशल मीडियात चांगलीच चर्चा घडत आहे. त्यामुळे आता मुंबईतील सभेत राज ठाकरे कोणाचा व्हिडीओ लावायला सांगणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.