|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » टिकटॉककडून भारतात 100 कोटी डॉलरची गुंतवणूक!

टिकटॉककडून भारतात 100 कोटी डॉलरची गुंतवणूक! 

     न्यायालयाच्या आदेशाचा कंपनीवर परिणाम शुन्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुगल आणि ऍपलने आपल्या ऑनलाईन स्टोअरमधून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकला हटविले आहे. परंतु, याचा वापर करत असलेल्या लोकांवर काहीच परिणाम झाला नाही तसेच हे ऍप चालविणारी कंपनी कोणत्याही चिंतेत नाही. चायनीज इंटरनेट टेक्नॉलॉजी असलेली कंपनी बाई डान्स या ऍपमध्ये भागिदार कंपनी आहे. येणाऱया काळात तीन वर्षासाठी ही कंपनी टिकटॉकसाठी भारतात 100 कोटी डॉलर (सुमारे 7 हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे.

बाई डान्स ही कंपनी जगभरात सर्वात किंमती स्टार्टअप्स मध्ये भागिदार आहे. सॉफ्टबँक, जनरल ऍटलान्टीक, केकेआर आणि सिकोया यांच्या गुंतवणुकीतही सहभागी आहे. टिकटॉक व्यतिरिक्त हॅलो आणि विगो व्हिडीओ सारखे ऍप बाई डान्सकडून भारतात सुरू आहेत. भारतात सध्या टिकटॉकवरून सुरू असलेल्या घटनाक्रमावर आम्ही निराश आहोत, परंतु आम्ही आशा व्यक्त करतो की लवकरच हे प्रकरण मिटविण्यात येईल, असे बाई डान्सचे संचालक हेलेना लेर्श्च यांनी सांगितले.

भारतात या वर्षीच्या शेवटी कंपनी आपल्या कर्मचाऱयांची संख्या एक हजारापर्यंत वाढवणार आहे. यामध्ये 250 लोक ऍपच्या सामग्रीवर नजर ठेवतील. जर ऍप वर चुकीची सामग्री आढळल्यास तात्काळ हटविण्याचे काम करण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे.

 टिकटॉकचे भारतात सुमारे 12 कोटी वापरकर्ते आहेत. यात तरुणांची संख्या अधिक आहे.