|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मतदानासाठी यंत्रणा सज्ज

मतदानासाठी यंत्रणा सज्ज 

महिला, पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र रांगा : मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी : व्हीव्हीपॅटचा प्रथमच वापर

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

 रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. एकूण 1,942 मतदान केंद्रांवर 14 लाख 54 हजार 524 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सिंधुदुर्गात 915 मतदार केंद्रे असून 6 लाख 66 हजार 720 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सिंधुदुर्गात 915 मतदान केंद्रे असून 6 लाख 66 हजार 720 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी सात सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदान प्रक्रियेसाठी पाच हजार निवडणूक कर्मचारी नेमण्यात आले असून बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र प्रचारातील रंगत पाहता शिवसेनेचे विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे यांच्यातच खरी लढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 1,942 मतदान केंद्रे असून 14 लाख 54 हजार 524 मतदार आहेत. त्यामध्ये 7 लाख 42 हजार 478 महिला मतदार, तर 7 लाख 12 हजार 34 पुरुष मतदार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ात एकूण 915 मतदान केंद्रे असून 6 लाख 66 हजार 720 मतदार आहेत. त्यामध्ये 3 लाख 34 हजार 865 महिला मतदार व 3 लाख 31 हजार 853 पुरुष मतदार आहेत. तसेच जिल्हय़ातील एकूण मतदारांमध्ये 2 हजार 570 दिव्यांग मतदार आहेत. यातील दिव्यांगांना त्यांच्या मागणीनुसार व्हील चेअरची व वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. त्यांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत येण्याजाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण मतदारांव्यतिरिक्त 780 सैनिक मतदार असून ते पोस्टल मतदान करणार आहेत.

5,030 निवडणूक कर्मचारी तैनात

जिल्हय़ातील 915 मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, विभागीय अधिकारी व निवडणूक कर्मचारी मिळून एकूण 5 हजार 30 कर्मचाऱयांची नियुक्त करण्यात आली आहे. हे सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचाऱयांनी आदल्या दिवशीच सोमवारी मतदान केंद्रांचा ताबा घेतला आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य पोहोच झाले आहे. निवडणुकांसाठी 2,015 बॅलेट युनिट, 1,050 कंट्रोल युनिट, तर 1,049 व्हीव्हीपॅट मशीन तैनात ठेवल्या आहेत. मतदान प्रक्रियेवेळी मशीन बंद पडल्यास तात्काळ मशीन बदलण्यात येणार आहे. त्यासाठी जादा मशीन ठेवण्यात आल्या आहेत. सात वाजता मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी मॉकपोल घेतला जाणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत 50 मते ट्रायल म्हणून घेण्यात येणार आहेत.

महिला-पुरुषांच्या स्वतंत्र रांगा

मतदान प्रक्रियेवरील गडबड-गोंधळ होऊ नये, शांततेत मतदान करता यावे, यासाठी महिला व पुरुष मतदारांच्या स्वतंत्र रांगा लावल्या जाणार आहेत. सध्याचा कडक उन्हाळा लक्षात घेऊन मतदान केंद्राबाहेर सावली शेड उभारण्यात आल्या आहेत. पाळणा घराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

2500 पोलीस तैनात

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. होमगार्डही मदतीसाठी देण्यात आले आहेत. त्याशिवाय जिल्हय़ाबाहेरून राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ा आल्या आहेत. एकूण 2,500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सायंकाळी सात वाजता मतदान संपल्यावर मतदान यंत्रे सीलबंद करून पोलीस बंदोबस्तात प्रांताधिकारी कार्यालयात एकत्रित आणली जाणार आहेत. त्यानंतर लगेचच पोलीस बंदोबस्तात रत्नागिरी येथे पाठविली जाणार आहेत.

व्हीव्हीपॅटचा प्रथमच वापर

लोकसभा निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे मतदारांना उत्सुकता लागली आहे. मतदारांनी मतदान केल्यानंतर आपण ज्या उमेदवाराला मतदान केले, त्यालाच मतदान बरोबर झाले की नाही याची स्लीप सात सेकंदांसाठी दिसणार आहे.

प्रत्येकाने मतदान करावे – जिल्हा प्रशासन

प्रत्येकाने मतदान करणे म्हणजे लोकशाहीतील सुदृढ लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने मिळालेला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा. सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच विविध क्षेत्रात आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे मतदानामध्येही मागे न राहता शंभर टक्के मतदान घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कुणीही मतदानापासून वंचित राहू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे व मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.