|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » साध्वी प्रज्ञासिंगला दिलासा

साध्वी प्रज्ञासिंगला दिलासा 

प्रतिनिधी/ मुंबई

एखाद्या आरोपीने निवडणूक लढवावी अथवा लढवू नये किंवा त्याला निवडणूक लढवण्यापासून रोखणे हा निर्णय न्यायालयाच्या अखत्यारित येत नाही, याचा निर्णय पेंद्रीय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे एनआयए न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. तसेच, विशेष सत्र न्यायालयाने (एनआयए) साध्वी याचिकाकर्त्यांनी दाखल केलेली याचिका कायदेशीरदृष्टय़ा टिकणारी नाही, असे मत नोंदवले. तसेच साध्वीला लोकसभा निवडणूक लढण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह सध्या जामिनावर बाहेर आहेत. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर आरोपींविरोधात युएपीए अंतर्गत खटला सुरू आहे. जामीन मंजूर करताना खटल्याच्या नियमित सुनावणीला हजर राहण्याची अट घातलेली असतानाही सतत प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करून त्यांनी ही हजेरी टाळलेली आहे. दुसरीकडे साध्वी प्रज्ञासिंग यांना भाजपने थेट मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून लोकसभेचे तिकीट दिले आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात मुलगा गमावलेल्या नासिर बिलाल यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली असून साध्वीला इतर आरोपींसह मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात (एनआयए) सुरू असलेल्या सुनावणीसाठी नियमित हजेरी लावण्याचे तसेच तिला लोकसभा निवडणूक लढण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका विशेष सत्र न्यायालयात दाखल केली होती. त्यावर मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान ही याचिका निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित असून याचिकेतील मागणी आणि आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळून याचिकाकर्त्यांना मोठा आर्थिक दंड आकारावा, असे उत्तर प्रतिज्ञापत्राद्वारे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने सादर केले होते.

बुधवारी न्यायाधीश विनोद पाडाळकर यांनी सुनावणी सुरू होताच याचिकाकर्त्यांनी दाखल केलेली ही याचिका कायदेशीरदृष्टय़ा टिकणारी नाही, असे मत नोंदवत सदर याचिका फेटाळून लावली. मात्र, याचिकाकर्त्यांना कोणताही आर्थिक दंड न आकारता समज देण्यात आली आहे. तर, साध्वीला क्लीन चीट दिली असल्याचे लेखी उत्तरात लिहिण्याची काय गरज होती? न्यायालयाला आरोपात तथ्य जाणवले म्हणूनच साध्वीवर याआधी आरोप निश्चित करण्यात आले असल्याचे तपासयंत्रणा न्यायालयाने खडे बोल सुनावले. त्यामुळे आता मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह आमने-सामने ठाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.