|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘अभिजीत’ मुहूर्त साधत मोदींचा उमेदवारी अर्ज

‘अभिजीत’ मुहूर्त साधत मोदींचा उमेदवारी अर्ज 

वाराणसीत समर्थकांचा मोठा पाठिंबा  घटकपक्षाच्या नेत्यांची उपस्थिती ठरली लक्षवेधक : प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी आरोप नसल्याचेही जाहीर

वृत्तसंस्था/ वाराणसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक 2019 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत मोठा विजय संपादन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभ ‘अभिजीत मुहूर्ता’ची निवड केली होती. वाराणसीमधीलच सुप्रसिद्ध पंडितांनी हा शुभ मुहूर्त काढला होता. शुभ मुहुर्तानुसार दिवस, तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली होती. मोदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वाराणसीतील काळभैरव मंदिरात पूजा-अर्चा केली. यानंतर काही गल्ल्यांमधून लोकांच्या भेटी घेत घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले.

आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीत सकाळी बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझा बूथ सर्वात मजबूत हा संदेश देतानाच महिलांचे मतदान 5 टक्क्याने अधिक व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत भाजपाचे वरि÷ नेत्यांसोबत एनडीएचे वरि÷ नेते उपस्थित होते. भाजप नेत्या सुषमा स्वराज, भाजपाध्यक्ष अमित शहा हेदेखील पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहिले. त्याचसोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल, रामविलास पासवानही हजर होते. त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारीही हजारो लोक उपस्थित होते.

चिखलातून कमळ फुलवणार

विरोधी पक्षांचा प्रत्येक उमेदवार हा आदरणीय आहे, त्यांच्याशी वैर नाही, बंधुभाव बाळगा असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मला शिव्या देणाऱयांची पर्वा करत नाही, शिव्यांच्या चिखलातून कमळ फुलवतो असे मोदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी म्हणाले. तत्पूर्वी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत 7 कि.मीचा रोड शो केला होता. या रोड शो नंतर त्यांनी गंगा आरतीमध्ये देखील सहभाग दर्शवला होता.

संपत्तीमध्ये 52 टक्के वाढ

2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात नरेंद्र मोदींच्या चल संपत्तीमध्ये 52 टक्के वाढ झाली आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. आपल्या विरोधात कुठलाही गुन्हेगारी आरोप नसल्याचे पंतप्रधान मोदींनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तसेच आपल्याकडे फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरुपात जास्त चल संपत्ती आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण संपत्ती 2.51 कोटी रुपये आहे. चल संपत्ती 1.41 कोटी रुपये आणि अचल संपत्ती 1.10 कोटी रुपये आहे. सरकारी वेतन आणि बचतीवर मिळणारे व्याज हे नरेंद्र मोदींचे उत्पन्नाचे मुख्य स्त्राsत आहेत.