|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तोतया अधिकारी विजय रणसिंग याचा जामीन अर्ज नामंजूर

तोतया अधिकारी विजय रणसिंग याचा जामीन अर्ज नामंजूर 

प्रतिनिधी / ओरोस:

विभागीय शिक्षण सचिव असल्याचे सांगून बनावट नियुक्ती पत्रे देणाऱया आणि लाखो रुपये उकळल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी विजय राजेन्द्र रणसिंग (28, रा. कळंब, जिल्हा उस्मानाबाद) याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता स्वप्निल सावंत यांनी काम पाहिले.

शालेय शिक्षण विभागांतर्गत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागाच्या वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याचे सांगून रणसिंग यांने जिल्हय़ात धुमाकूळ घातला होता. बारावी परीक्षेदरम्यान विविध परीक्षा केंद्रावर भेटी दिल्या होत्या. माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी त्याला कसाल परीक्षा केंद्रावर पकडले होते. तर कणकवली कांबळे गल्ली येथील तेजस नरसिंग गवळी यांना क्लार्क पदावर भरती करणार असल्याचे सांगून त्यांचीही फसवणूक केली होती. त्यांच्याकडून शैक्षणिक कागदपत्रेही घेतली होती. तसेच वेळोवेळी सुमारे एक लाख 52 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये मुलाखतीचा बनाव रचून नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला 29 मार्च 2019 रोजी अटक केली होती. 30 रोजी त्याला 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी तर त्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान, त्याने जामिनासाठी अर्ज केला होता.

जामिनावरील झालेल्या सुनावणीत संशयित आरोपीवर भंडारा पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा फसवणुकीचा गुन्हा दाखल असून तेथे त्याने 43 लोकांची फसवणूक करून खोटी नियुक्ती पत्रे दिली व 82 लाख रुपयांची लुबाडणूक केल्याची तक्रार दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच त्याने तेथून पोबारा केला होता. त्यानंतर सिंधुदुर्गात वास्तव्य करुन येथेही फसवणुकीचा प्रकार केला आहे. सराईत गुन्हेगार असल्याने तो जामिनावर मुक्त झाल्यास पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करू शकतो. साक्षीदारांवर दबाव आणण्याची व पुराव्यात फेरफार करण्याची शक्यता असल्याची बाब सरकारी वकीलांनी न्यायालयासमोर मांडली.

Related posts: