|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » वोटिंगसाठी अमेरिका टू पिंपरी…!

वोटिंगसाठी अमेरिका टू पिंपरी…! 

 

 पिंपरी/ प्रतिनिधी :  मतदानाच्या दिवशी प्रशासनाकडून सुट्टी जाहीर केली जाते किंवा मतदानासाठी कामांच्या वेळांमध्ये सूट दिली जाते. मात्र, तरीही अनेक जण मतदान करण्याबाबत फारसे उत्सुक नसतात. किंबहुना काहीजण सुट्टीचा गैरफायदा घेत बाहेरगावी फिरायला जाणे पसंत करतात. तर काही जण वेळ नसल्याचे सांगत मतदान करणे टाळतात. मात्र, पिंपरी, रहाटणी येथील मूळचे रहिवासी आणि आता कामानिमित्त अमेरिका येथे स्थायिक झालेल्या त्रिवेदी कुटुंबीयांनी खास मतदानासाठी केंद्र गाठत आपला हक्क बजावला.

जय आणि कविता त्रिवेदी हे दोघेही आयटी इंजिनिअर आहेत व अमेरिकेत एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करतात. ते खास अमेरिकेतून मतदानासाठी आपल्या गावी परतले व त्यांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्कही बजावला. नोकरीनिमित्त अमेरिकेत असणारे त्रिवेदी यांनी लोकसभा मतदानासाठी आवर्जून वेळ काढत मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. रहाटणी येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. जगात कुठेही असलो तरी मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक भारतीयाने मायदेशी परतणे आवश्यक आहे, असे सांगताना याच भावनेने आपणही आपल्या गावी येऊन मतदान केल्याचे त्यांनी सांगितले. मतदानासाठी आपण भारतात एकटेच आलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्याप्रमाणेच आमचे काही मित्रही अमेरिकेतून पुण्यात मतदानासाठी आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अरबमधून येऊनही मतदान न करता आल्याची तक्रार निगडी येथील रसिका दीपक जोशी यांनी केली आहे. मतदार ओळखपत्र तसेच आधरकार्डसह अन्य कागदपत्रे असतानाही मतदारयादीत नाव नसल्याचे कारण देत आपल्याला मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रसिका यांचे पती दीपक जोशी हे अरब देशातील बहरीन येथे नोकरीनिमित्त मागील 30 वर्षांपासून राहत आहेत. मतदानासाठी रसिका या भारतात आल्या. सकाळी साडेनऊच्या सुमारास निगडीतील यमुनानगर येथील शिवभूमी विद्यालयात त्या नेहमीप्रमाणे मतदानासाठी गेल्या. मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, वाहन परवाना ही कागदपत्रे त्यांच्याकडे होती. मात्र, मतदारयादीत त्यांचे नाव नसल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. त्यांनी याबाबत मतदान केंद्र प्रमुखांकडे तक्रार केली आहे.

अधिक माहिती देताना रसिका जोशी म्हणाल्या, 1990 पासून आम्ही मतदानासाठी भारतात येतो. प्रत्येक लोकसभा व विधनसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतो. नियमितपणे मी मतदानासाठी आले. परंतु, मतदान करता येणार नाही, हे कारण समजल्यानंतर धक्काच बसला. माझा पैसा आणि वेळ वाया गेला. त्याहीपेक्षा जास्त मला मतदान करता आले नाही, याचे दुःख आहे.