|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वडुजमध्ये 7 तोळे दागिन्यासह चार लाख लांबवले

वडुजमध्ये 7 तोळे दागिन्यासह चार लाख लांबवले 

प्रतिनिधी/ वडूज

वडूज शहरात अज्ञात चोरटय़ांनी सात तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख रुपये रोख रक्कम लांबविली. तसेच चोरटय़ांनी अन्य तीन घरांची कुलूपे उचकटून चोरीचा प्रयत्न केला. या चोरीच्या घटनांमुळे वडुज शहर परिसरात प्रचंड घबराहट पसरली आहे.   

    याबाबतची अधिक माहिती अशी, रविवार 28 रोजी मध्यरात्री चोरटय़ांनी भाजी विक्रेते नंदकुमार नारायण गोरे यांच्या घरी जबरी चोरी केली. त्यामध्ये चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराचे दाराचे कुलूप उचकटून आतील कपाटातील सात तोळे सोने व चार लाख रुपयांची रोख रक्कम लांबविली. गोरे कुटुंबीय नजीकच्या खोलीत झोपले होते. व्यवसायानिमित्त परगावी जाण्यासाठी पहाटे चार वाजता उठले असता त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. 

 तसेच बाजार पटांगणातील अशोकराव काळे यांच्या बंद घराची कडी उचकटून चोरटय़ांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचे चिरंजीव प्रथमेश हे उठले असता  त्यांना अज्ञात आठ ते नऊ जण चोरटे तोंडाला रूमाल गुंडाळून त्यांच्या घरासमोरील बाजूने पळत गेल्याचे दिसले. अलंकार चित्र मंदिरानजीकच्या पंतनगर परिसरातील सुभाषराव येळगावकर हे येरळवाडी गावच्या यात्रेनिमित्त गावी गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. चोरटय़ांनी घरातील लोखंडी कपाट उचकटून साहित्याची उलथापालथ केली. मात्र, त्यांच्या हाताशी काही लागले नाही. तसेच नजीकच्याच अशोकराव राऊत यांच्या घरीदेखील चोरीचा प्रयत्न झाला त्याठिकाणाहून काही रोख रक्कम लांबविल्याचे समजते.

   शहरात अज्ञात चोरटय़ांनी धुमाकूळ घातल्याचे समजताच श्वान पथक व ठसे तज्ञांचे पथक दाखल झाले. याबाबत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक श्री. हंसाटे तपास करीत आहेत.

Related posts: