|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बुधवारपासून उडणार हैद्राबादचे विमान

बुधवारपासून उडणार हैद्राबादचे विमान 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव येथील सर्व प्रकारची विमानसेवा स्थगित करून हुबळीला स्थलांतर केलेल्या स्पाईस जेटचे पुनरागमन येत्या बुधवार दि. 1 मेपासून पुन्हा एकदा बेळगाव विमान तळावर होणार आहे. बुधवारपासून बेळगाव ते हैद्राबाद अशा दैनंदिन विमानसेवेची सुरुवात ही कंपनी करणार आहे. वेगवेगळय़ा कारणांनी या मार्गावर प्रवास करणाऱयांची यामुळे चांगली सोय होणार आहे.

बेळगाव ते चेन्नई, मुंबई, बेंगळूर आणि हैद्राबाद अशा सेवा देणाऱया स्पाईस जेटने हुबळीचा उडानच्या दुसऱया यादीत समावेश झाल्यानंतर बेळगाव विमानतळाला रामराम ठोकला होता. यामुळे काही काळ बेळगावातून विमानसेवाच उपलब्ध झाली नव्हती. नागरिकांच्या रेटय़ामुळे बेळगाव विमानतळाचा समावेश उडानच्या तिसऱया यादीत झाला आणि बेळगाव-हैद्राबाद हा विमानमार्ग या सेवेत सवलतीच्या दरातील प्रवासात रुजू झाला. शिवाय स्पाईस जेट कंपनीला हा मार्ग सुरू करण्यासाठी मान्यताही मिळाली. यामुळे आता 1 मेपासून या कंपनीची ही सेवा सुरू होऊ शकणार आहे.

दररोज दुपारी 4.10 वाजता हैद्राबाद येथून विमान निघून सायंकाळी 5.35 वाजता बेळगावला पोहोचणार असून सायंकाळी 5.55 वाजता बेळगावहून निघून सायंकाळी 7.10 वाजता हैद्राबादला पोहोचणार आहे. सरकारी अधिकारी, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी तसेच हैद्राबाद-चेन्नईमार्गे विदेश प्रवास करणारी मंडळी बेळगाव-हैद्राबाद मार्गावर सातत्याने प्रवास करतात. त्यांच्या दृष्टीने ही विमानसेवा सोयीची ठरणार आहे.

15 मेकडेही लक्ष

उडानअंतर्गतच बेळगाव ते अहमदाबाद ही विमानसेवा स्टार एअर कंपनीकडून 15 मेपासून सुरू होणार असल्याचे जाहीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावहून अहमदाबादकडे प्रवास करणाऱया नागरिकांचे या तारखेकडे लक्ष लागून राहिले आहे. अहमदाबादलाही व्यापार व उद्योगाच्या दृष्टिकोनातून कायम प्रवास होतो. खासगी वाहने तसेच बस व रेल्वेसारख्या प्रवासी माध्यमांचा वापर यापूर्वी होत होता. मात्र आता थेट उड्डाणाची सोय मिळणार असल्याने त्याबद्दलची प्रतीक्षा लागून राहिली आहे.