|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मोठा उद्योग आल्यास सांगलीचा ‘कायापालट ’निश्चित

मोठा उद्योग आल्यास सांगलीचा ‘कायापालट ’निश्चित 

नव्या उद्योगामुळे सांगलीची बाजारपेठ गर्दीने पुन्हा फुलेलः

संजय गायकवाड / सांगली

सांगली मिरज कुपवाड या तिन शहरांची मिळून महापालिका स्थापन होऊन 21 वर्ष झाली. पण या एकवीस वर्षात महापालिका क्षेत्रातील औद्योगिक वसाहती आणि एमआयडीसींतील उद्योगांना चालना देण्यासाठी कोणाकडूनही जाणिवपुर्वक प्रयत्न झालेले नाहीत. दुसरीकडे सांगली शहर वा परिसरात काही हजार लोकांच्या हाताला काम देणारा एखादा उद्योग आणण्यासाठीही प्रयत्न झालेले नाहीत. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चार वर्षापुर्वी सांगलीत  एक हजार लोकांच्या हाताला काम मिळवून देणारा उद्योग उभा करणार असल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र याबाबत काहीही हालचाली झालेल्या नाहीत. सांगलीच्या बाजारपेठेला उर्जितावस्था आणि ही बाजारपेठ पुन्हा एकदा गर्दीने फुलून जाण्यासाठी सांगलीला मोठया उद्योगाची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्याकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

सांगली हे तसे म्हंटले तर जरा बऱयापैकी मोठे असलेले शहर आहे. त्यातही महापालिका झाल्यावर म्हणजे 1998नंतर या शहराची वाढ झालेली दिसून येते. त्यापुर्वी  नगरपालिका असताना सांगली हे छोटेसे शहर होते.  त्यातल्या त्यात मोठे खेडेगांव असावे. पण मनपाच्या स्थापनेनंतर या शहराची कोल्हापूर रोड, हरिपूर रोड, माधवनगर रोड, धामणी रोड, मिरज रोड, कुपवाड रोड अशा दिशेला वाढ झाली. तुलनेने कर्नाळ रोडला गेल्या पाच ते सात वर्षात मंगल कार्यालये, दुकाने वगैरे होऊ लागली आहेत. माधवनगर आणि मिरज ही सांगलीला अगदी खेटून असलेली दोन शहरे आहेत.त्यामुळे या दोन शहरांच्या दिशेला सांगलीची वाढ जास्त प्रमाणात झालेली आहे.

गेल्या वीस वर्षात सांगली शहर आणि महापालिका क्षेत्राची लोकसंख्याही वाढली. सध्यस्थितीला सहा लाखाच्या घरात लोकसंख्या असलेल्या मनपा क्षेत्राचे क्षेत्रफळ मात्र वाढले नाही. हे विशेषत, कारण आजही मनपाचे क्षेत्रफळ 118 चौ.कि.मी. इतकेच आहे. सांगलीच्या आसपास अनेक उपनगरे उभी राहिली. सांगलीलगतची माधवनगर, बुधगांव, कवलापूर, बिसूर, कुपवाड, बामनोळी, हरिपूर, अंकली, धामणी ही गावेही मोठी होत चालली आहेत.

सांगली हे बाजारपेठेचे शहर म्हणून पश्चिम महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. सांगलीला होलसेल आणि रिटेल बाजारपेठ आहे. सांगलीचे वसंतदादा  मार्केट यार्ड आणि  फळ मार्केटही प्रसिध्द आहे. गणपती पेठेही तग धरून आहे. पण आजूबाजूच्या गावासह तालुक्यांची ठिकाणे विकसीत झाल्याने त्याचा सांगलीच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. आजही सांगली शहर बाजारपेठेवर टिकून आहे.

सांगलीत छोटे मोठे उद्योगधंदे आहेत. पण मोठा उद्योग नाही.माधवनगरची कॉटन मिल तसेच वसंतदादा सुतगिरणीसह काही उद्योग बंद पडले. वसंतदादा औद्योगिक वसाहतीसह कुपवाड आणि मिरज एमआयडीसीतील काही युनिटस बंद आहेत. तर काही चांगल्या पध्दतीने सुरू आहेत. अगदी काही युनिटमधून निर्यातक्ष्म उत्पादन घेतले जाते

सांगलीला मोठया उद्योगाची आवश्यकता आहे. कारण येत्या पाच वर्षात पुणे मिरज लोंढा या रेल्वेच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम पुर्ण होणार आहे. नागपूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाचेही काम गती घेणार आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ नवीन पुल तसेच हरिपूर येथेही सांगली कोल्हापूर या दोन जिल्हयांना जोडणारा नवा पुल उभारण्याचा प्रस्ताव आहे.  रांजणीच्या ड्रायपोर्टलाही वेग येईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

 सांगलीजवळील कवलापूर विमानतळावर हेलिकॉप्टर उतरू शकतात. सांगलीमध्ये अलीकडील काही वर्षामध्ये हॉटेल व्यवसाय चांगला वाढला आहे. रेडीमेड ब्रँडेंड कपडयाची शोरूम्स, शाळा कॉलेजचे चांगले नेटवर्क, अभियांत्रिकी ,मेडीकल  दंत , नर्सिग, आर्कीटेक्ट  कॉलेजस यामधून दरवर्षी बाहेर पडणारे हजारो विद्यार्थी ,सांगली मिरजेतील मेडीकल हब, दवाखाने आणि हॉस्पिटलचे जाळे, कुपवाडमधील छोटे मोठे कारखाने यांची नव्याने सांगड घालण्यासाठी सागंली शहर अगर शहराच्या जवळपास मोठा उद्योग उभा करण्याची आवश्यकता आहे.

 राज्य शासनाला हे कठीण नाही. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुसता शब्द टाकला तरी सांगलीला मोठा उद्योग येऊ शकतो. सर्वपक्षीय नेत्यांकडूनही याबाबत प्रयत्न होणे गरजेचे आहे. सांगलीची साखर कारखानदारी, शेतीपुरक उत्पादने, हळद, बेदाणे, द्राक्षे, डाळींब या शेतीपुरक  उत्पादनाशी संबधित जरी एखादा उद्योग आला तरी सांगलीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.

Related posts: