|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कॅन्टोन्मेंट बोर्डकडून 90 टक्के घरपट्टी वसूल

कॅन्टोन्मेंट बोर्डकडून 90 टक्के घरपट्टी वसूल 

प्रतिनिधी/ बेळगाव

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये 1295 मालमत्ता असून 2018-19 आर्थिक वर्षात 57 लाखाचा महसूल वसूल करण्यात आला आहे. यामुळे 90.47 टक्के घरपट्टी वसुलीची उद्दिष्टपूर्ती झाली आहे. विकासकामे राबविण्यास हा निधी अपुरा पडणार आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डचे उत्पन्न कसे वाढणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. 

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीची व्याप्ती मोठी आहे. पण बहुतांश भाग लष्कराच्या कार्यक्षेत्रात येतो. बंगले आणि बाजारपेठेत 1295 मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या माध्यमातून मिळणारा महसूल लाखाच्या घरात आहे. 2018-19 आर्थिक वर्षात 63 लाख 21 हजार मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट होते. यापैकी 57 लाख 18 हजार रुपये म्हणजेच 90.47 टक्के घरपट्टी वसूल झाली आहे. इतक्मया निधीमधून विकासकामे राबवून कोणत्या सुविधा उपलब्ध करणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी मे व जूनपर्यंत मुदत देण्यात येते. त्यानंतर जुलै महिन्यापासून 1 टक्का कर दंड म्हणून आकारला जातो. मात्र, कॅन्टोन्मेंट हद्दीतील खुले भूखंड अथवा जागेला कर आकारणी केली जात नाही. यामुळे कॅन्टोन्मेंटचे उत्पन्न खूपच तुटपुंजे आहे.

स्मार्ट सिटीतून विकासकामे राबविण्याची गरज

कॅन्टोन्मेंट परिसरात विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. अपुऱया निधीमुळे विकासकामे ठप्प होत आहेत. कॅन्टोन्मेंट हा शहराचा अविभाज्य भाग आहे. स्मार्ट सिटी म्हणून गणल्या जाणाऱया बेळगाव शहराच्या प्रवेशाच्या वाटा कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत येतात. स्मार्ट सिटी करण्याच्यादृष्टीने कॅन्टोन्मेंट बोर्डमधील समस्यांचा विचार करून विकासकामे राबविण्याची गरज आहे. पण त्यादृष्टीने शासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डचा कारभार संरक्षण खात्याच्या अखत्यारित येत असल्याने विकासकामे राबविण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी मंजूर केला जातो. हा निधी वेळेवर मंजूर केला जात नसल्याने विकासकामे राबविण्यास अडचण निर्माण होत आहेत. यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील मालमत्तांकडून मिळणाऱया घरपट्टी आणि गाळय़ांच्या भाडय़ाच्या रकमेमधून कार्यालयाचा खर्च भागवून विकासकामे राबवावी लागतात. परिणामी काही कामे अर्धवट अवस्थेत रखडली आहेत.