|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या कार्यमुक्ती आदेशाला आक्षेप

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या कार्यमुक्ती आदेशाला आक्षेप 

प्रतिनिधी / ओरोस:

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील सर्वच शिक्षकांना 6 मे रोजी कार्यमुक्त होऊन 7 मे रोजी बदली झालेल्या शाळेवर हजर होण्याचा मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या आदेशाला विस्थापित शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. विस्थापित शिक्षकांनी न्यायासाठी कोकण आयुक्तांकडे अपिले केली आहेत. त्यावर निर्णय होईपर्यंत विस्थापित शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.

ऑनलाईन पद्धतीने जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना 6 मे रोजी कार्यमुक्त होऊन 7 मे रोजी बदली झालेल्या शाळेवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विस्थापित शिक्षक आता कार्यमुक्त झाल्यास त्यांना आयुक्तांचा निर्णय त्यांच्या बाजूने लागल्यास पुन्हा दुसऱया शाळेवर जावे लागणार आहे. त्यामुळे विस्थापितांना कार्यमुक्तीसाठी सवलत देण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सल्लागार चंद्रकांत अणावरकर यांच्या नेतृत्वाखाली अन्यायग्रस्त 67 शिक्षकांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत कैफियत मांडली.

 31 मे या दिनांकावर शिक्षकांना बदलीस पात्र की अपात्र हे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यापूर्वीची कार्यमुक्ती या आदेशाला छेद देणारी आहे. बदली आदेश प्राप्त झाल्यावर 1 जूननंतर त्याची अंमलबजावणी होईल, असे सूचित करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षाचा कालावधी 1 जून ते 31 मे असल्याने 31 मे रोजी कार्यमुक्ती होणे अपेक्षित आहे. महिलांची बदली दुर्गम भागात झाल्याने ही बाब शासनाच्या महिला धोरणाच्या विरोधातील आहे. समानीकरणाच्या जागा खुल्या करून त्या रिक्त पदांवर समायोजन करण्याचे आदेश आहेत. मात्र त्यांना तशी संधी न देता कार्यमुक्त करणे, हा त्यांच्यावरील अन्याय आहे. पती-पत्नी एकत्रीकरण धोरणालाही छेद दिला गेला आहे. गरोदर शिक्षिका, स्तनदा माता यांचा कार्यमुक्तीबाबत मानवता वादातून विचार व्हावा, आदी बाबी सीईओसमोर ठेवण्यात आल्या आहेत.

 दरम्यान शिक्षकांनी या आदेशाप्रमाणे बदली झालेल्या शाळेवर हजर व्हावे. आयुक्तांचा निर्णय शिक्षकांच्या बाजूने लागल्यास संबंधित शिक्षकांचे सोयीस्कर समायोजन केले जाईल, असे संगितल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, अन्यायग्रस्त शिक्षिका अस्मिता पोखरणकर, चैत्राली पाटील, सायली आटक, शारदा भोई, मंगेश तेंडोलकर आदी उपस्थित होते.

 या प्रकरणी माजी आमदार यांनी आयुक्तांचे दूरध्वनीवरून लक्ष वेधले आहे. ते रजेवर असल्याने त्यांनी उपसचिवांचे लक्ष वेधले असून याबाबत सकारात्मक निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन माजी आमदार राजन तेली यांनी दिले असल्याची माहितीही यावेळी चंद्रकांत अणावकर यांनी दिली.