|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ठेका मिळविण्यासाठी बनविले खोटे दाखले अन् शिक्केही

ठेका मिळविण्यासाठी बनविले खोटे दाखले अन् शिक्केही 

चर्चेतील ग्रामपंचायतीतील प्रकार 

पोलीस निरीक्षकांकडे तक्रार

चौकशीअंती होणार कारवाई – पोलीस

प्रतिनिधी / मालवण:

गेले काही दिवस चर्चेत असलेल्या गावात सार्वजनिक विहिरी बांधण्याच्या कामाच्या ठेक्यासाठी चक्क सरपंचांच्या सहीचे खोटे दाखले आणि खोटे शिक्के तयार केल्याचा प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी तत्कालीन सरपंच व उपसरपंचांनी मालवण पोलीस निरीक्षक यांच्याकडे फौजदारी तक्रार दाखल करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सरपंचांनी पोलीस निरीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, गावात सार्वजनिक विहीर खोदण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मंजूर केला होता. त्यासाठी ठेकेदार मंजुरीची कार्यवाहीही सुरू होती. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे संबंधित प्रस्तावाबाबत चौकशी करून हा प्रस्ताव नामंजूर करण्याचा ठराव ग्रामपंचायतीतर्फे मंजूर करून सादर करण्यात आला होता. त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. त्यामुळे माहितीचा अधिकार वापरून माहिती घेतली.

माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती

माहितीच्या अधिकारात घेतलेल्या माहितीत धक्कादायक माहिती उघड झाल्याचे सरपंचांनी तक्रारीत म्हटले आहे, यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सादर करण्यात आलेले या विहिरीचे काम इतर यंत्रणेकडून करून घेण्यास ग्रामपंचायतीची हरकत नाही, असे पत्र हे सरपंचांच्या खोटय़ा सहीचे आहे.  ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला हा तारीख व जावक नंबर नसलेला आहे व खाली ग्रामसचिव व सरपंचांच्या सहय़ा भलत्याच लोकांनी केलेल्या आहेत. शिक्काही खोटाच आहे, असा बोगस कागद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने स्वीकारलेला आहे. विहीर होणार असल्याचा दाखलाही बिनतारखेचा व खोटा शिक्का मारून बनविलेला आहे. विहीर मंजुरीसाठी केलेला अर्जही बिनतारखेचा, जावक क्रमांक नसलेला व खोटय़ा शिक्क्याचा आहे, तरीही पाणीपुरवठा विभागाने आक्षेप घेतलेला नाही. ज्या ठरावाने मालमत्ता संपादित केली, तो ग्रामपंचायत दप्तरी ठराव प्रोसिडिंगला घेतलेलाच नाही. स्थावर मालमत्ता रजिस्टरला ही नोंद नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

पोलीस चौकशी सुरू आहे..

पोलिसांकडे चौकशी केली असता, ग्रामपंचायतीने दिलेल्या तक्रारीवर चौकशी सुरू आहे, असे स्पष्ट करण्यात आले. सरपंच व उपसरपंचांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कोकण आयुक्त, ग्रामविकासमंत्री, पालकमंत्री, आमदार, पंचायत समिती यांच्याकडेही तक्रार केली आहे.

11 लाख रुपयांची विहीर

सार्वजनिक विहीर तब्बल 11 लाख रुपयांची बांधण्यात येत आहे. या विहिरीचा ठेका घेण्यावरून ग्रामपंचायत आणि गावातील इतर काही राजकीय मंडळींमध्ये वाद निर्माण झाल्याने गेले काही महिने ही ग्रामपंचायत सतत चर्चेत आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्याच बनावट सहय़ा करून शासकीय यंत्रणेला फसविण्यात आल्याचा प्रकार समोर येत असल्याने पोलिसी तपासात सत्य समोर येणार काय? की चौकशीचा फार्स वर्षानुवर्षे सुरू राहणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. पोलीस निरीक्षकांकडे केलेल्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही न झाल्यास पोलीस अधीक्षक यात लक्ष देणार काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.