|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » डीपी रोडवरील ‘त्या’ बांधकामांना मुख्याधिकारी नोटिसा देणार

डीपी रोडवरील ‘त्या’ बांधकामांना मुख्याधिकारी नोटिसा देणार 

नगराध्यक्ष समीर नलावडेंची माहिती : डीपी रोडवरील विक्रेत्यांवर उद्यापासून कारवाई

वार्ताहर / कणकवली:

 कणकवली शहरातील डीपी रोडवरील अतिक्रमणे अखेर 8 मेपासून हटविण्यात येणार आहेत. या अतिक्रमण केलेल्या भाजी, फळ विक्रेत्यांना सोमवारी सायंकाळी नगराध्यक्ष समीर नलावडे व न. पं.च्या कर्मचाऱयांनी सूचना दिली. बुधवारी मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाकडून संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळी कुणाच्याही दबावाखाली ही कारवाई थांबविण्यात येणार नाही. त्यामुळे विक्रेत्यांनी आपले नुकसान होऊ नये म्हणून रस्ता व गटारावरील दुकाने मांडू नयेत, असे नलावडे यांनी सांगितले. डीपी रोडवर नव्याने बांधण्यात आलेल्या स्टॉलधारकांनाही मुख्याधिकारी नोटिसा बजावणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले.

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने डीपी रोड तयार करण्यात आला असताना या रोडवर अतिक्रमणे वाढल्याने अखेर नगराध्यक्ष नलावडे यांनी कर्मचाऱयांसह सोमवारी या अतिक्रमणांची पाहणी करीत ही अतिक्रमणे हटविण्याची सूचना दिली. यावेळी गटनेते संजय कामतेकर, वाहतूक पोलीस प्रकाश गवस, बंडू गांगण, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम पथकाचे पदनिर्देशीत अधिकारी भाई साटम, मनोज धुमाळे, प्रवीण गायकवाड, रवी म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.

नगराध्यक्ष नलावडे यांनी डीपी रोडच्या सुरुवातीपासून महामार्गापर्यंत आलेल्या सर्व विक्रेत्यांना कारवाईबाबत सूचना दिली. किती अंतरापर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्याबाबत न. पं. कर्मचाऱयांनी सफेद रेषा मारून हद्द निश्चित करून दिली आहे. डीपी रोडचे गटार व त्या पुढील भागातील सर्व विक्रेत्यांना बुधवारपासून कोणतीही कल्पना न देता अतिक्रमित वस्तूंवर जप्तीची कारवाई मुख्याधिकाऱयांमार्फत करण्यात येणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले.

डीपी रोडवर ज्या भाजी व फळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत, त्यांची वाहनेही दिवसभर या रस्त्यावर उभी असताना त्यामुळे या पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्याची मागणी कामतेकर यांनी वाहतूक पोलिसांकडे केली. डीपी रोडवर काही ठिकाणी पक्के बांधकाम करून त्यावर स्टॉलची उभारणी करण्यात येत असल्याबाबत निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी नगराध्यक्षांकडे कारवाईची मागणी केली. मात्र, याबाबत मुख्याधिकाऱयांनी कारवाईचा निर्णय घेतल्याचे नलावडे यांनी सांगितले.