|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पाणीटंचाईच्या 208 कामांना अखेर मंजुरी

पाणीटंचाईच्या 208 कामांना अखेर मंजुरी 

आचारसंहितेमुळे रखडली होती कामे : पाणीकामांसाठी आचारसंहिता शिथील

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

पाणीटंचाईच्या कामांसाठी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता निवडणूक आयोगाने शिथील केली आहे. त्यामुळे गेले दोन महिने आचारसंहितेमुळे रखडलेल्या पाणीटंचाईच्या 208 कामांना अखेर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मंजुरी दिली असून आता पाणीटंचाईच्या कामांना सुरुवात होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हय़ात उद्भवणाऱया संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जि. प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत 2018-19 साठी चार गावे, 513 वाडय़ांचा समावेश असलेला सहा कोटी 13 लाखाचा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला. त्याप्रमाणे जसजशी पाणी टंचाईची तीव्रता जाणवू लागली, त्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार भूजल सर्वेक्षण विभागाकडून सर्व्हे करून पाणीटंचाईच्या कामांची अंदाजपत्रके तयार करून कामांच्या मंजुरीसाठी दोन महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱयांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती.

जिल्हाधिकाऱयांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या 208 प्रस्तावामध्ये विंधन विहिरीचे 50 प्रस्ताव, विंधन विहीर दुरुस्तीचे 40 प्रस्ताव, विहीर खोल करणे व गाळ काढण्याचे 33 प्रस्ताव, नळपाणी पुरवठा दुरुस्ती करणे 83 प्रस्ताव, तात्पुरती पूरक नळपाणी पुरवठा करणे दोन प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. परंतु 10 मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हाधिकाऱयांनी एकही प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नव्हती. त्यामुळे गेले दोन महिने पाणीटंचाईची कामे मंजुरीविना रखडली होती.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातच महाराष्ट्र राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघातून निवडणुका झाल्याने निवडणूक आचारसंहिता शिथील करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. मुख्यमंत्र्याच्या मागणीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने पाणी टंचाईच्या कामांसाठी निवडणूक आचारसंहिता शिथील केली आहे. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या सचिवांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंग घेऊन पाणी टंचाईच्या कामांसाठी निवडणूक आचारसंहिता शिथील करण्यात आल्याचे जिल्हा अधिकाऱयांना कळविण्यात आले. त्याप्रमाणे जि. प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागानेही तातडीने जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून पाणीटंचाईच्या कामांना मंजुरी देण्याची मागणी केली. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनीही तातडीने दखल घेत पाणीटंचाईच्या 208 कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे टंचाईच्या कामांना सुरुवात होणार आहे. टंचाईच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी माजी आमदार राजन तेलींनीही विशेष पाठपुरावा केला होता.

दरम्यान, नळपाणी पुरवठा दुरुस्ती व तात्पुरती पूरक नळपाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी 31 मार्चपर्यंत मुदत होती. या कामांनाही 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे नळपाणी पुरवठा दुरुस्तीची 83 कामे आणि तात्पुरती पूरक नळपाणी पुरवठा योजनेची दोन कामे मंजूर करण्यात आली आहेत.