|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मंगळ- राहुचा हलाहल योग 22 जूनपर्यंत सर्व बाबतीत जपा

बुध. 8 ते 14 मे 2019

दि. 7 मे 2019 पासून मंगळ- राहुचा हलाहल योग सुरू होत असून तो 22 जूनपर्यंत राहील. हे दोन ग्रह युतीत असताना विषारी फळे निर्माण करतात. हा काळ बाधिक स्वरुपाचा असतो. कुणाच्या पायाने कोणती बाधा अथवा पीडा घरात शिरेल सांगता येणार नाही. रहाती वास्तु स्वच्छ ठेवा. अपघात, आत्महत्या, दंगली, गोळीबार, हल्ले, मारामाऱया, करणीबाधा, भानामतीसारखे प्रयोग यांचे प्राबल्य याच काळात वाढत असते. ज्यांच्या कुंडलीत हा योग असतो, त्यानी तर विशेष काळजी घ्यावी. बाधिक ठिकाणी जाणे टाळावे. रस्त्यावर मंतरलेले लिंबू, गंडेदोरे, नारळ व गुलाल टाकलेला भात यासह बऱयाच बाधिक वस्तू लोक टाकत असतात. अशाने कुणाचे भले होणार नाही. पण कलियुग असल्याने कुणाच्या मनात काय असेल ते सांगता येणार नाही. त्यासाठी अशा बाधिक वस्तू चुकूनही ओलांडू नयेत. हल्लीची तरुण पिढी अशा गोष्टी मानत नाही, पण काही त्रास सुरू झाला की मग या लोकांची धावपळ सुरू होते. काही क्यक्तींच्या बोलण्यातून बाधिक जागांचा उल्लेख होत असतो. त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण ते त्यांचे अनुभवाचे बोल असतात. काही भूमीवर युद्ध, अपघात, घातपात व तत्सम कारणाने असंख्य लोकांचे रक्त सांडलेले असते. त्यामुळे त्या जागा बाधिक बनतात. अमावास्या, वैधृती व व्यतिपात भद्र, करिदिन अशा योगावर त्या अतृप्त शक्ती जागृत होतात, व ज्यांची कुडी हलकी असेल त्याला झपाटतात. ज्याला आपली मातृभाषा स्पष्ट बोलता येत नाही, अशा व्यक्ती अस्खलीत इंग्लिश, जपानी अथवा कोणत्याही अवघड भाषा बोलू लागतात. बाधिक पीडाग्रस्त व्यक्ती घराण्यातील पूर्वीच्या घटना अथवा पूर्वजन्मात कुणाच्या हातून काय दोष घडलेले आहेत ते धडाधड सांगत असतात. या बाबी कशा घडतात हे अद्यापपर्यंत कुणीही सिद्ध करू शकलेले नाहीत. प्रेतयात्रा जात असताना त्यावरील फुले रस्त्यावर पडत असतात, ती कधीही ओलांडू नयेत. काही समाजात मृतदेहावर घातलेली फुले लोकांच्या हातात देतात व मंत्रोच्चार अथवा श्रद्धांजलीपर भाषणे झाल्यावर ती फुले त्या मृतदेहावर टाकतात. मृतदेहावरील फुले कुणी हातात दिल्यास ती चुकूनही हाती घेऊ नयेत. प्रेतबाधा, भूतबाधा व पिशाच्चबाधा हमखास होते व नंतर ते निस्तरताना नाकीनव येतात. अपघाती जागा, धोकादायक वळणे, धबधबे, नदीकाठ, समुद्रकिनारे तसेच मृतदेह ठेवण्याच्या जागा अशी ठिकाणे शक्मयतो टाळावीत. परदेशात रासायनिक प्रक्रिया करून काहीजण मृतदेह अनेक वर्षे जपून ठेवतात, अशा जागा  म्हणजे स्मशानच! अशा जागा हमखास बाधिक ठरतात. भारतातसुद्धा अशी ठिकाणे आहेत. मंगळ- राहुच्या या योगाला ‘हलाहल योग’ असे म्हणतात. या योगाचा प्रामुख्याने वास्तुवर अनिष्ट प्रभाव पडतो. यासाठी रहाती वास्तु शांत व पवित्र ठेवा. धार्मिक वातावरण ठेवा. मंत्र-स्तोत्रांचे वाचन सतत चालू ठेवा. तसेच घरात नकारात्मक विचारांना चुकूनही थारा देऊ नका, तसेच करणीबाधा, अंगारे, धुपारे, लिंबू- गंडेदोरे, मंतरलेल्या वस्तू अशा बाबींपासून चार हात दूर रहा. तरच या मंगळ राहुचा विषारी प्रभाव टाळता येईल. मारुती उपासना यावर रामबाण उपाय आहे.

मेष

मंगळाचे सहकार्य असल्याने दीर्घस्वरुपी मोठय़ा कामांना हात घालू शकता. आतापर्यंत न होणारी कामेही होऊ लागतील. घरात कुणाचे मंगलकार्य अडलेले असेल तर त्याला गती मिळेल. मोठय़ा संकटाच्यावेळी ऐनवेळी कुणीतरी देवासारखे उभे राहतील व महत्त्वाच्या किचकट प्रसंगातून सुटका होईल. आर्थिक व्यवहारातील अडचणींना पूर्णविराम मिळेल.


वृषभ

मंगळ- राहू धनस्थानी असल्याने या आठवडय़ात महत्त्वाची स्थित्यंतरे घडण्याची शक्मयता आहे. या योगाला शुभ फळ देण्याचे बळ नाही. त्यामुळे कुणावर विसंबून राहणे योग्य ठरणार नाही. राशीस्वामी शुक्र लाभात असून तो कोणत्याही कामात उत्तम यश देईल. मंगलकार्यात अचानक विघ्ने येतील. चुकून कुणीतरी दुसऱयांना पाठविलेले एखादे पत्र फोन अथवा संदेश तुम्हाला येईल. त्यामुळे गैरसमजाला वाव मिळेल.


मिथुन

मंगळ- राहू तुमच्या राशीत आहेत. वाहन जपून चालवा. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. पण धाडसाने येणाऱया प्रसंगाला सामोरे जा. तुमचे काहीही वाकडे होणार नाही. आर्थिक व्यवहारात फायदा होईल. त्यामुळे अडचणी कमी होतील. आतापर्यंत घेतला नसाल असा महत्त्वाचा निर्णय या आठवडय़ात घ्याल व  तो अचूक असेल.


कर्क

गुरु अनुकूल असल्याने  कोणतेही व्यवहार पूर्ण करू शकाल. भावी काळातील गुंतवणुकीसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. जीवनाला कलाटणी देणारे ग्रहमान आहे. अत्यंत अवघड कामदेखील करून दाखवाल. जुन्या गंजलेल्या वस्तू, वापरलेले  फर्निचर, चुकूनही खरेदी करू नका. नको ती पीडा घरात शिरेल.


सिंह

गुरु, शुक्राचा शुभयोग, तुम्हाला सर्व कामात प्रचंड यश मिळवून देईल. शारीरिक दोष निघण्याच्या दृष्टीने योग्य मार्ग सापडेल. राहू-मंगळामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील, पण घराण्यातील काही शापीत दोष मात्र जागृत होण्याची शक्मयता आहे. त्यासाठी वास्तु शांत व पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा.


कन्या

दशमात मंगळ, राहू हा योग राजयोग मानला जातो. अनेक कामात मोठे यश देणारा हा योग आहे. खर्च वाढले तरी सतत पैसा येत राहील. शुक्र अनुकूल आहे. काही चांगल्या कामांचा प्रारंभ कराल. हाती पैसा खेळू लागेल. दीर्घकालीन समस्या मिटतील. प्रेमप्रकरणे, आर्थिक भाग्योदय या बाबतीत अनुकूल काळ.


तुळ

मंगळ, राहू योगामुळे वाईटातून काही वेळा चांगलेही घडते, याचा अनुभव या आठवडय़ात येईल. अनेक ग्रहांचे सहकार्य मिळेल. तुमची बाजू खरी असेल व कौटुंबिक वातावरण आनंदी धार्मिक व स्वच्छ असेल तर जीवनाला भाग्योदयकारक कलाटणी मिळेल. एखादी क्यक्ती तुमच्या जीवनात महत्त्वाचे व कायम स्मरणात राहणारे प्रसंग आणेल. पण योग्यता पाहूनच निर्णय घ्यावा लागेल.


वृश्चिक

मंगळ, राहू आठव्या स्थानी शिवाय साडेसाती असल्याने काही महत्त्वाच्या कामाची गती थंडावण्याची होण्याची शक्मयता आहे. त्याचा दैनंदिन व्यवहारावरही परिणाम होईल. आर्थिक दृष्टय़ा हा आठवडा चांगला आहे. त्यामुळे कोणत्याही बाबतीत त्रास होणार नाही. सावकारी व्यवहार, अनैतिक धनार्जन, व्यसन वगैरे असेल तर मात्र सांभाळा.


धनु

मंगळ- राहु युतीमुळे अती धाडस करू नका. या सप्ताहात चंद्र-शुक्राचा शुभयोग अनेक बाबतीत यश देणारा आहे. त्यातही लग्न,वास्तुशांत, महत्त्वाची खरेदी- विक्री या बाबतीत चांगली फळे मिळू शकतील. शनि साडेसाती सुरू आहे. भाग्यात हर्षल जीवनाला शुभ कलाटणी मिळण्याची शक्मयता आहे. नोकरी व्यवसायाच्या बाबतीत चांगल्या संधी येतील.


मकर

राशीस्वामी शनि लाभात चांगला असून शुक्राचे सहकार्यही चांगले मिळणार आहे. त्यामुळे मोठी कामे, घरदार वगैरेच्या बाबतीत अडलेले व्यवहार पूर्ण होतील. सरकारी काम असेल तर ते पूर्ण करून घ्यावे. मनाजोगते यश मिळू शकेल. मंगळ, राहू योगामुळे नातेवाईकांच्या बाबतीत जर मतभेद असतील, तर त्याचा परिणाम या आठवडय़ात दिसेल.


कुंभ

राहू- मंगळ बाधिक योग सुरू आहे. रस्त्यात एखाद्याला मदत करायला जावे व नेमकी तीच व्यक्ती कर्दनकाळ ठरावी व त्यामुळे संपूर्ण जीवनाचा नकाशाच बदलावा असे ग्रहमान आहे. राहू, मंगळाचा प्रभाव अधिक आहे. एखाद्या तिऱहाईतामुळे सांसारिक जीवनात कटुता निर्माण होईल. आर्थिक व्यवहारात सावध राहिल्यास सर्व काही सुरळीत होईल.


मीन

धनस्थानी हर्षल व तुमच्या राशीतील शुक्र शुभ कार्यातील अडचण दूर करतील. परदेश प्रवास अथवा भागीदारी व्यवसायात काही तरी गोंधळ होण्याची शक्मयता आहे. सांसारिक जीवनात पारदर्शकपणा ठेवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा काही ओळखी व पूर्वीची प्रकरणे कटुताही निर्माण करू शकतात. कर्जप्रकरणे असतील तर ती मिटवा. जामीन राहिला असाल तर सावध रहा.