|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » कर्नल अरविंद जोगळेकर यांना अखेरचा निरोप

कर्नल अरविंद जोगळेकर यांना अखेरचा निरोप 

पुणे /  प्रतिनिधी

 कर्नल अरविंद जोगळेकर (निवृत्त) यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी 12 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराकडून पुष्पचक्र वाहून कर्नल जोगळेकर यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. जोगळेकर यांचे सोमवारी रात्री पुण्यात निधन झाले. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे आणण्यात आले. साहित्य, संस्कृती, संरक्षण यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कर्नल जोगळेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. लष्कराच्या अधिकाऱयांकडून पुष्पचक्र वाहून जोगळेकर यांना मानवंदना देण्यात आली. या वेळी लष्करातील अनेक आजी-माजी अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 जोगळेकर हे मूळचे बेळगावचे. त्यांचे शिक्षणही बेळगावमध्ये झाले. जोगळेकर हे 1962 मध्ये लष्कराच्या कोअर ऑफ सिग्नल्समध्ये रुजू झाले. 1965 व 1971 च्या युद्धात, श्रीलंकेतील ऑपरेशन पवन, मालदीवमधील कारवाईतही ते सक्रिय होते. त्यांना लष्करप्रमुखांचे प्रशस्तीपत्रही मिळाले होते. जम्मू-काश्मीर, पूर्वोत्तर राज्यांसह त्यांनी विविध भागात सेवा बजावली होती. व्याख्यान आणि पुस्तकांच्या माध्यमातून कर्नल जोगळेकर यांनी पुण्यातल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला होता. आपल्या कारकिर्दीत नेतृत्व केलेल्या लष्करी तळांवर, तिथल्या स्थानिक नागरिकांवर, भौगोलिक-सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीवर त्यांनी अनेक लेख लिहिले. त्यांचे एकत्रित संकलन करून पुस्तकेही प्रकाशित केली. ‘मी एक सैनिक’, ‘चारधाम यात्रा’, ‘मेरे वतन के लोगो’, ‘हाक हिमालयाची-साद संस्कृतीची’ या त्यांच्या काही पुस्तकांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. काही चित्रपटांमधील भूमिकांबरोबर त्यांनी काही जाहिरातींमध्येही काम केले होते.

 चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व हरपले : मान्यवरांची श्रद्धांजली

 त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात आला. लष्करासह साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रातही कर्नल जोगळेकर यांनी अमीट ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने समाज एका चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाला मुकला आहे, अशा शब्दात त्यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून आदरांजली वाहण्यात आली.

 राज्याने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावले : हेमंत महाजन 

 कर्नल जोगळेकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. प्रसिद्ध लेखक, अभिनेते म्हणून ते ओळखले जात. मॉडेलिंगमध्येही त्यांनी ठसा उमटविला. देशाच्या सुरक्षेच्या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले. तसेच व्याख्यानांमधूनही याविषयावर विवेचन केले. ते अनेक सामाजिक संस्थांशीही जोडले गेले होते. त्यांच्या अकाली निधनाने राज्याने एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दांत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.