|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लांजाच्या सुकन्येची अमेरिकेत अवकाशशिक्षणासाठी निवड

लांजाच्या सुकन्येची अमेरिकेत अवकाशशिक्षणासाठी निवड 

प्रतिनिधी/ लांजा

 लांजातील मृणाल मनोज रेडीज हिची अमेरिकेतील आईवा विद्यापीठामध्ये अवकाश तंत्रज्ञान शिक्षणासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागात मराठी शाळांमधून शिक्षणाचे धडे घेतलेल्या मृणाल हिने परदेशी शिक्षणासाठी घेतलेल्या गरूडझेपीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मृणाल रेडीज हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नं 5 येथे तर माध्यमिक शिक्षण लांजातील न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. त्यानंतर बारावीचे शिक्षण लातूर येथे विज्ञान शाखेतून घेतले. त्यानंतर मात्र अवकाश तंत्रज्ञानाचे स्वप्न उराशी बाळगलेल्या मृणालने ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जिद्दीने परिश्रम घेतले. देशातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱया कर्नाटक राज्यातील मणिपाल येथे बीएसएसीठी प्रवेश मिळवला. मेहनत आणि जिद्द ठेवून त्या ठिकाणी तिने आपला वेगळाच ठसा उमटवला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी विख्यात परदेशी विद्यापीठासाठी तिची निवड झाली.

लांजा सारख्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापिठात अवकाश तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी निवड झालेली मृणाल लेडीज ही एकमेव ठरली आहे. प्राथमिक मराठी शाळेमध्ये शिक्षण घेत असताना इयत्ता तिसरीमध्ये यश मिळविण्यास सुरूवात केली ती आज कुठेही न थांबता यशाला गवसणी घातली आहे. चौथीत शिष्यवृत्ती परिक्षेत जिह्यात प्रथम, पाचवीत असताना एमटीएस मध्ये, नवोदय, सातवीत शिष्यवृत्ती जिह्यात पुन्हा यश, आठवीत पुन्हा एमटीएस, दहावीत कोकणात भागात यश प्राप्त केले. त्यानंतर लातूर येथील शाहू कॉलेजमधून तेथील जिल्हास्तरावर यश प्राप्त करण्याचा बहुमान मृणाल हिने प्राप्त केला आहे. दरम्यान मृणाल हिने आयआयटी, सीबीएस अशा इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमधुन मराठी भाषेतून शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सीटीसाठी निवड झालेली मृणाल रेडीज ही एकमेव ठरली आहे.   

मृणालने आपल्या यशाचे श्रेय देताना  स्वतःसह आई-वडील, आजी-आजोबा आणि सर्व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचा असल्याचे सांगते. तर वडील प्राथमिक शिक्षक मनोज रेडिज यांनी आपल्या मुलीच्या परिश्रमाचे चीज झाल्याचे सांगितले.  

मृणालने अवकाश तंत्रज्ञान शिक्षणासाठी परदेशी घेतलेली झेप सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मेहनत, आत्मविश्वास आहेच मात्र त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आपण शिक्षण घेत असताना योग्य क्षेत्र निवडूण त्यादृष्टीने मेहनत, जिद्द कोणातही न्यूनगंड न बाळगता प्रयत्नशील रहील्यास यश नक्की गाठता येते असे बोलताना मृणाल लेडीज हिने व्यक्त केले. मृणाल हीने मिळविलेले सुयश हे लांजा तालुका वासीयांसाठी अभिमानास्पद असून मृणालच्या सुयशाबद्दल सर्व स्तरातून तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.