|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » निवृत्त शिक्षिकेचे मरणोत्तर देहदान

निवृत्त शिक्षिकेचे मरणोत्तर देहदान 

वार्ताहर/ परुळे

‘मरावे परी किर्ती रुपे उरावे’! पूर्वीच्याकाळी शाळांमध्ये त्यावेळचे शिक्षक विद्यार्थ्यांकडून प्रार्थनेच्या माध्यमातून या श्लोकाचे पठन करून घेत. त्याचे आचरण कसे करावे, याची शिकवण देत. नेमकी हीच शिकवण त्या काळात विद्यार्थ्यांना देणाऱया परुळे येथील निवृत्त शिक्षिका सौ. शैलजा शिवराम प्रभू (85) यांनी मरणोत्तर देहदान करून आपले जीवन खऱया अर्थाने अमर करीत समाजासमोर नवा आदर्श घालून दिला.

मरणोपश्चात आपल्या देहाचा समाजासाठी काहीतरी काहीतरी उपयोग व्हावा, यासाठी प्रचंड इच्छाशक्ती बाळगून असलेल्या शैलजाबाईंना त्यांच्या या संकल्पात कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी त्या मृत्यूशय्येवर असतानाच त्यांना अखेरच्या क्षणी पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. नंतर मरणोत्तर देहदानाची सर्व प्रक्रिया रितसर पार पडून लाईफ टाईम हॉस्पिटलने शैलजा यांचे पार्थिव आपल्या ताब्यात घेतले.

‘लाईफ टाईम’ हॉस्पिटलमुळे संकल्प तडीस

सौ. शैलजा प्रभू या चिपी विमानतळ आंदोलनाचे नेतृत्व करणारे निवृत्त शिक्षक श्री. बाजी प्रभू यांच्या पत्नी होत. शैलजा यांच्या संपूर्ण कुटुंबियांनीच काही वर्षापूर्वी देहदानाचा रितसर संकल्प सोडला होता. नुसता संकल्प केला, तरी तो तडीस नेणे ही प्रक्रिया फार कठीण असते. यापूर्वी देहदान करायचे असल्यास मृत्यू पश्चात पार्थिव तीन तासाच्या आत कोल्हापूर मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचवावे लागायचे. सिंधुदुर्गात तशी सुविधा नसल्यामुळे ही धावपळ करावी लागायची. यामध्ये बऱयाच तांत्रिक अडचणी देखील असायच्या आणि त्यामुळे देहदानाचे संकल्प अपुरेच राहायचे. खासदार नारायण राणे यांच्या पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर आर. एस. कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार नारायण राणे यांनी या इस्पितळात देहदानाची प्रक्रिया सिंधुदुर्गवासीयांना सुरळीतपणे पार पाडता यावी, यासाठी व्यवस्था केली आणि प्रभू कुटुंबियांनी शैलजा यांच्या देहदान संकल्पास मूर्त रुप दिले.

अखेरच्या क्षणी करावी लागली धावपळ

खरं तर शैलजाताईंचा हा देहदान संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रभू कुटुंबियांना अखेरच्या क्षणी खूप धावपळ करावी लागली. ज्यावेळी शैलजाताईंचा अखेरचा श्वास सुरु होता, त्यावेळी हा संकल्प कसा तडीस न्यावा याबाबत कुटुंबियांमध्ये चर्चा सुरु झाली. यासाठी लगतच्या परुळे आरोग्य केंद्रामध्ये याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही प्रक्रिया आपण पूर्ण करू शकत नाही, असे सांगण्यात आले. नंतर खासगी डॉक्टरनी देखील हात वर केले. शेवटी परुळेतील रहिवासी वासू माधव व ऍड. अमोल सामंत यांच्या पुढाकाराने शैलजा यांना तातडीने पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सोमवारी 6 रोजी सायंकाळी त्यांना दाखल करण्यात आले आणि 7 रोजी पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर लाईफ टाईम हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ञांनी सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण करीत शैलजाताईंचे पार्थिव ताब्यात घेतले. मरणोत्तर देहदान करणाऱया शैलजाताई हय़ा परुळे येथील पहिल्या महिला ठरल्या.

शैलजा प्रभू यांच्या पश्चात पती बाजी प्रभू, दोन मुलगे, तीन मुली, सुन, जावई व नातवंडे असा परिवार आहे.