|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दशावतारी नाटय़ महोत्सव 14 मेपासून

दशावतारी नाटय़ महोत्सव 14 मेपासून 

प्रतिनिधी/ पणजी

ज्ञानदीप गोवा आयोजित दशावतारी नाटय़ महोत्सव सांखळी (गोवा) येथील रवींद्र भवन येथे 14 मेपासून सुरू होत आहे. यात एकूण 10 दशावतारी नाटय़ मंडळांची निवड करण्यात आली आहे. सांखळी व परिसरातील नाटय़ रसिकांना 14 ते 18 मेपर्यंत दर्जेदार नाटकांची मेजवानीच यानिमित्ताने मिळणार आहे.

14 मे रोजी सायंकाळी 5 वा. नाटय़ महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर 6 वा. नाटय़ प्रयोगाला सुरुवात होईल. दररोज रसिकांना दोन नाटय़प्रयोग पाहता येणार आहेत. पहिला प्रयोग सायंकाळी 6 वाजता, तर दुसरा रात्री 8.30 वा. सुरू होणार असून प्रत्येक नाटय़प्रयोग हे दोन तासांचे राहतील. महोत्सवाचा समारोप 18 मे रोजी रात्री होईल. महोत्सवातील दहा मंडळांमधून उत्कृष्ट नाटय़प्रयोग तसेच उत्कृष्ट राजा, उत्कृष्ट खलनायक, उत्कृष्ट स्त्राr भूमिकेसाठी तसेच उत्कृष्ट वाद्यपथक आणि उत्कृष्ट संघ यासाठी खास पारितोषिके दिली जाणार आहेत. त्याचबरोबर दशावतारी नाटय़ कलेतील तिघा ज्येष्ठांचा सत्कारही केला जाणार आहे.

महोत्सवाचा सविस्तर कार्यक्रम

पाच दिवशीय या दशावतारी नाटय़ महोत्सवाचा सविस्तर कार्यक्रम ज्ञानदीपचे अध्यक्ष आणि लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीचे चेअरमन तथा तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार 14 रोजी सायंकाळी 5 वा. उद्घाटन सोहळा, त्यानंतर 6 वा. आजगावकर दशावतारी नाटय़मंडळाचे, तर 8.30 वा. गुरुकृपा दशावतार मंडळ, हळवळचे नाटक सादर होईल.

15 रोजी सायंकाळी 6 वा. बोर्डेकर पारंपरिक दशावतार मंडळ दोडामार्ग व रात्री 8.30 वा. कलावैभव दशावतार नाटय़मंडळ न्यू कॉलनी सत्तरी गोवातर्फे नाटय़प्रयोग सादर होईल. 16 रोजी सायंकाळी 6 वा. बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळ, कवठी व रात्री 8.30 वा. कला संगम दशावतारी नाटय़मंडळ घोटेली केरी सत्तरी यांचा नाटय़प्रयोग सादर होईल.

17 मे रोजी सायंकाळी 6 वा. वावळेश्वर दशावतार नाटय़मंडळ तेंडोली व रात्री 8.30 वा. चेंदवणकर दशावतार मंडळाचा नाटय़प्रयोग होईल. 18 रोजी नाटय़प्रयोगाच्या वेळेत बदल करण्यात आला असून पहिला प्रयोग सायंकाळी 5 वा. खानोलकर दशावतार नाटय़मंडळ व सायंकाळी 7.30 वा. जय हनुमान दशावतार नाटय़मंडळ, वेंगुर्ल्याचा नाटय़प्रयोग होईल. त्यानंतर रात्री बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

या महोत्सवातील सर्व नाटय़प्रयोग व समारोप समारंभाच्या वेळी आयोजित विशेष कार्यक्रम सर्वांना मोफत आहे. प्रथम येणाऱयास प्रथम या तत्वावर आसन व्यवस्था राहणार आहे.