|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दीड लाखाची दारू कणकवलीतून जप्त

दीड लाखाची दारू कणकवलीतून जप्त 

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

अल्टो कारही जप्त 

फेंडय़ाच्या युवकावर गुन्हा दाखल

वार्ताहर / कणकवली:

महामार्गावरून अल्टो गाडीतून गोवा बनावटीची दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून महामार्गावर कणकवली बसस्थानकानजीक सापळा रचत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱयांनी केलेल्या कारवाईत एक लाख 39 हजार 800 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. यात दारू वाहतूक करीत असलेली अल्टो कारही जप्त करण्यात आली. दारू वाहतूक करत असलेल्या किशोर वासुदेव सामंत (32, फोंडाघाट – बोकलभाटले) याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 8 मे रोजी सकाळी 8.40 वा. करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक श्री. साळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती अल्टो कार (एमएच07 क्यू 3729) मधून फोंडाघाटच्या दिशेने दारू वाहतूक होत असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार या विभागामार्फत बसस्थानकानजीक सापळा रचून ही गाडी थांबवून तपासणी केली. त्यावेळी गाडीत गोवा बनावटीच्या मॅकडॉल नं. 1 व्हिस्कीच्या एका बॉक्समध्ये 12 यानुसार 10 बॉक्समध्ये 750 मि.ली. च्या 90 हजाराच्या 120 बाटल्या, डीएसपी ब्लॅक व्हिस्कीच्या 750 मि. ली. च्या 2 बॉक्समध्ये 16 हजार 200 रुपयांच्या 24 बाटल्या व डीएसपी ब्लॅक व्हिस्कीच्या 180 मि. ली. च्या 33 हजार 600 च्या 240 बाटल्या अशी मिळून एकूण 1 लाख 39 हजार 800 रुपयांची दारू व 1 लाख 50 हजाराची पांढऱया रंगाची अल्टो कार मिळून सुमारे 2 लाख 89 हजराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त यशवंत पवार, अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभारी निरीक्षक राजन साळगावकर यांनी केली. कारवाईत दुय्यम निरीक्षक गणेश जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान सुरज चौधरी, महिला जवान स्नेहल कुवेसकर, रणजीत शिंदे यांनी सहभाग घेतला. या पथकाला या कारवाईसाठी श्री. खान व श्री. शहा यांनी मदत केली. याप्रकरणी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ, ई, व 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास श्री. साळगावकर करत आहेत.