|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गात 140 गावे जोखीमग्रस्त जाहीर

सिंधुदुर्गात 140 गावे जोखीमग्रस्त जाहीर 

पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा कृती आराखडा : नऊ वैद्यकीय पथके नियुक्त

1 जूनपासून नियंत्रण कक्ष

चार महिने पुरेल एवढा औषध साठा

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

पावसाळय़ात उद्भवणाऱया विविध साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हय़ातील 140 गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्यात एक व जिल्हास्तरावर एक अशी एकूण नऊ वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. 1 जूनपासून 24 तास नियंत्रण कक्ष सुरू केला जाणार असून चार महिने पुरेल एवढा औषध साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.

पावसाळय़ात पूर स्थितीमुळे आजार निर्माण होऊ शकतात किंवा विविध साथीचे आजार निर्माण होऊ शकतात. त्यावर उपाययोजना करून तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा तयार करताना मागील पाच वर्षांत साथीचे आजार उद्भवलेली गावे, मोठय़ा जत्रा भरणारी गावे, दुर्गम गावे, पूर बाधित गावे यांचा विचार करून 140 जोखीमग्रस्त गावे निश्चित करण्यात आली आहेत.

जोखीमग्रस्त गावे निश्चित करताना लेप्टोस्पायरोसीस बाधित असलेली सर्वाधिक 91 गावे आहेत. तसेच पूरबाधित असणारी 53 गावे आहेत. दुर्गम व बारमाही एस. टी. न जाणारी सहा गावे, मोठय़ा यात्रा भरणारी सात गावे, मागील तीन वर्षांतील साथीची सहा गावे आहेत. काही गावे पूरबाधित, लेप्टोबाधित व साथीचे आजार असलेल्यांमध्ये समावेश असलेली आहेत. मात्र एकूण जोखीमग्रस्त गावे 140 आहेत.

यापैकी वैभववाडी तालुक्यात तीन, देवगड तालुक्यात 21, कणकवली तालुक्यात 11, मालवण तालुक्यात 15, कुडाळ तालुक्यात 34, वेंगुर्ले तालुक्यात 12, दोडामार्ग तालुक्यात 17, सावंतवाडी तालुक्यात 27 जोखीमग्रस्त गावे आहेत.

जोखीमग्रस्त 140 गावे आणि जिल्हय़ात इतर गावात उद्भवणाऱया साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात एक अशी एकूण नऊ वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्हास्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष 1 जूनपासून सुरू होणार आहे. लेप्टो साथीवरील नियंत्रणासाठी डॉक्सीसायक्लीनच्या गोळय़ा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. चार महिने पुरेल एवढा औषध साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉ. खलिपे यांनी दिली.

Related posts: