|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुंकळ्ळी नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव संमत

कुंकळ्ळी नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव संमत 

प्रतिनिधी /कुंकळ्ळी :

कुंकळ्ळीच्या नगराध्यक्षा लेविता मास्कारेन्हस यांच्यावरील अविश्वास ठराव बुधवारी 8-0 अशा फरकाने संमत झाला. यावेळी दोन नगरसेवकांनी उपस्थित राहूनही तटस्थ भूमिका बजावली, तर दोन नगरसेवक गैरहजर राहिले. काणकोण पालिकेचे मुख्याधिकारी सगुण वेळीप यांनी बैठकीचे कामकाज हाताळले. त्यांना कुंकळ्ळी पालिकेचे मुख्याधिकारी फडते यांनी साहाय्य केले.

कुंकळ्ळी पालिकेच्या 12 नगरसेवकांपैकी उपनगराध्यक्षांसह 8 नगरसेवकांनी नगराध्यक्षा मास्कारेन्हस यांच्यावर गैरकारभार चालविल्याचा ठपका ठेवत अविश्वास ठराव आणला होता. त्यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी खास बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मास्कारेन्हस तसेच नगरसेवक प्रेमदीप देसाई हेही अनुपस्थित राहिले. उद्देश गावकर व शशांक देसाई यांनी उपस्थिती लावली, मात्र त्यांनी मतदान प्रक्रियेत भाग न घेता तटस्थ भूमिका पत्करणे पसंत केले.

याप्रसंगी हात उंचावून मतदानाची प्रक्रिया अवलंबविण्यात आली. अविश्वास ठराव आणणारे आंजेला पैंगीणकर, पेंझी कुतिन्हो, सुकोरिना कुतिन्हो, किरण नाईक, पॉलिता कार्नेरो, मारियो मोराईस, अशोक फडते व उपनगराध्यक्ष विदेश उर्फ वीरेंद देसाई हे आठही नगरसेवक हजर होते. या सर्वांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. या आठही जणांनी मिळून कुंकळ्ळी नागरिक समितीची स्थापना केली आहे.

Related posts: