|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कावरेपिर्ला, बार्से पंचायतक्षेत्रे पाण्याच्या समस्येने त्रस्त

कावरेपिर्ला, बार्से पंचायतक्षेत्रे पाण्याच्या समस्येने त्रस्त 

एकनाथ गावकर / केपे :

सांगे तालुक्यात असलेले साळावली धरण हे केपे तालुक्याला जवळचे असून या तालुक्यातील शहरी भाग तसेच काही पंचायत क्षेत्रांत सदर जलाशयाचे पाणी उपलब्ध होत आहे. मात्र या तालुक्यातील कावरेपिर्ला तसेच बार्से पंचायतीत अजूनही साळावलीचे पाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही. तेथील लोकांना कूपनलिका, झऱयाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून उन्हाळय़ात पाण्याची पातळी कमी होऊ लागल्यावर त्यांना पाण्याची समस्या भेडसावू लागते आणि टँकरच्या पुरवठय़ावर अवलंबून राहावे लागते. सध्या हीच परिस्थिती त्यांच्यासह तालुक्यातील अन्य काही भागांवर आली आहे.

वरील दोन्ही पंचायत क्षेत्रांमध्ये अनुसूचित जमातींचे लोक जास्त असून त्यांना पाण्याची मूलभूत सुविधा नीट उपलब्ध व्हावी यासाठी कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याने अजूनपर्यंत प्रयत्न केलेले दिसत नाहीत. बार्सेसारख्या पंचायत क्षेत्रात जायकाद्वारे जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र हे काम रेंगाळल्याने तेथील लोकांना साळावली जलाशयाचे पाणी मिळणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

केपे तालुक्यातील केपे पालिका क्षेत्रात पाण्याची कसलीच कमतरता नसून लोकांना 24 तास पाणी मिळत आहे. मात्र अन्तरे या गावात पाण्याची समस्या होती. ती काही दिवसांपूर्वी सोडविण्यात आली आहे. तसेच सोमेश्वर-शिरवई येथील लोकवस्ती वाढल्याने तेथे काही प्रमाणात समस्या भेडसावत आहे. मात्र तेथील जुनी टाकी स्वच्छ करण्यात आली असून त्यात पाणी पोहोचल्याने या भागातील समस्याही सुटणार आहे.

Related posts: