|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बाबूशच्या गुन्हय़ांवर बोलण्याचा अधिकार भाजपला नाही

बाबूशच्या गुन्हय़ांवर बोलण्याचा अधिकार भाजपला नाही 

प्रतिनिधी /पणजी :

भाजपने बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन सरकार चालविले. त्याचबरोबर पीडीएच्या चेअरमनपदावर त्यांची नियुक्ती केली. त्या बाबूश मोन्सेरात यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची आठवण भाजपला आताच कशी काय आली, असा प्रश्न  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. निवडणूक आयोगाला स्वत:च्या गुन्हेगारी प्रकरणाचे प्रतिज्ञापत्र देण्याऱया माविन गुदिन्हो यांना मोन्सेरात यांच्या गुन्हेगारीवर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

2002 साली सर्वप्रथम भाजपने व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद दिले होते. त्यानंतर 2017 मध्ये पीडीए चेअरमनपदी मोन्सेरात यांची नियुक्ती केली. त्यावेळी त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची आठवण भाजपला झाली नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीच दोन्हीवेळा मोन्सेरात यांच्या संदर्भात निर्णय घेतला होता. मोन्सेरात हे गुन्हेगार असते तर त्यांना ही पदे दिली असती का? मोन्सेरात यांना क्लीन चीट भाजपनेच दिलेली आहे. आज निवडणकीतील विरोधी उमेदवार असल्याने भाजप तोल सुटल्याप्रमाणे आरोप करीत आहे.

भाजपमध्ये आल्यानंतर शुद्ध होतात

ज्यांच्या विरोधात तक्रारी करून ज्याना भ्रष्ट ठरविले जाते ते सर्व भाजपात येताच शुद्ध होतात का? विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, पांडुरंग मडकईकर हे भाजपात आल्यानंतर शुद्ध होतात. एरवी त्यांचा भ्रष्टाचार भाजपनेच चव्हाटय़ावर आणून त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. बाबूश मोन्सेरात यांना भाजपनेच राजमान्यता दिली होती. याचा विसर पडू देऊ नये, असेही ते म्हणाले.

ज्यावेळी पर्रीकर यांना निवडणूक जिंकायची होती त्यावेळी मोन्सेरात यांचा वापर केला जायचा. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मोन्सेरात यांना विजय सरदेसाई यांच्यामार्फत वापरले गेले. ज्यावेळी मोन्सेरात यांची गरज होती त्यावेळी ते चांगले व विरोधात गेल्यानंतर ते गुन्हेगार ठरतात का असेही चोडणकर म्हणाले.

Related posts: