|Monday, September 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पॅट्रियट क्षेपणास्त्र अमेरिकेकडून तैनात

पॅट्रियट क्षेपणास्त्र अमेरिकेकडून तैनात 

इराणविरोधात नवे पाऊल : तणाव वाढला

वृत्तसंस्था/  वॉशिंग्टन

 इराणसोबत वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेने कुठल्याही संभाव्य धोक्याला सामोरे जाण्याची तयारी वाढविली आहे. इराणकडून उद्भवणाऱया धोक्याला सामोरे जाण्यासाठी पश्चिम आशियात आणखी एक युद्धनौका आणि पॅट्रियट क्षेपणास्त्रs तैनात केली जात असल्याचे पेंटागॉनकडून सांगण्यात आले आहे. 

पश्चिम आशियात यापूर्वीच तैनात विमानवाहू नौका अब्राहम लिंकन आणि बी-52 बॉम्बवर्षक विमानांना साथ देण्यासाठी युएसएस आर्लिग्टन आणि पॅट्रियट हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केली जात आहे. अमेरिकेची सुरक्षा दले आणि हितसंबंधांच्या विरोधात इराणच्या आक्रमक सज्जतेचे संकेत मिळाल्यावर हे पाऊल उचलण्यात आले आहे. इराणसोबत संघर्ष करण्याची अमेरिकेची इच्छा नाही, पण क्षेत्रातील स्वतःच्या सैन्य आणि हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तयार असल्याचे पेंटागॉनने म्हटले आहे.

इराणकडून हितसंबंध आणि नागरिकांच्या विरोधात हल्ला झाल्यास अमेरिका त्वरित आणि निर्णायक कारवाई करणार असल्याचे अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पियो म्हणाले होते.

पॅट्रियट क्षेपणास्त्र

पॅट्रियट हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र 1991 च्या आखाती युद्धादरम्यान चर्चेत आले होते. अमेरिकेने इराक युद्धात या क्षेपणास्त्राचा प्रभावी वापर केला होता.