|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » क्लार्क करतोय वशिल्याने कामे

क्लार्क करतोय वशिल्याने कामे 

बसस्थानकातील क्लार्क देतोय ज्येष्ठांना त्रास, कडक कारवाईची होतेय मागणी

प्रतिनिधी / सातारा

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे ज्येष्ठांना सवलतीचे पास देण्याची योजना सध्या सुरु आहे. परिस्थितीने नडलेले किंवा आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या ज्येष्ठांना एस. टी. ने प्रवास करण्यासाठी ही योजना अत्यंत चांगली आहे. मात्र हे सवलतीचे पास देण्यासाठी सातारा बसस्थानकात असलेल्या कार्यालयातील संबंधित क्लार्क ज्येष्ठांना रांगेत ताटळकत ठेवत आहे.

काहींना रांगेऐवजी आतील बाजूने वशिल्याने पास देत असल्याचा प्रकार करत असून त्याला वरिष्ठांनी समज देवून काम शिस्तीत करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठांसाठी सवलतीच्या तिकीट दराचे पासेस व ओळखपत्र देण्यास सुरुवात करुन चांगला पायंडा पाडला आहे. ही सवलत घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे घेवून ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक हे सवलतीचे पासेस घेण्यासाठी रांगा लावत आहेत. रांग मोठी असल्याने आपल्याला वेळेत पास मिळावा म्हणून काही ज्येष्ठ नागरिक ग्रामीण भागातून पहाटे पासूनच येवून रांगेत उभे राहिलेले असतात.

या सवलतीच्या योजनेच्या कार्यवाहीसाठी जी खिडकी आहे, त्या खिडकीच्या आत जो क्लार्क बसत आहे तो मात्र त्याच्या धीम्या गतीने काम करत असतो. बऱयाच वेळा कार्यालयाच्या आतून त्याच्याकडे कोणीतरी येते, त्यांना प्राधान्य देण्यात या क्लार्कचा इंटरेस्ट खूपच दिसतो.

ज्येष्ठ नागरिक संतप्त

इकडे बाहेर रांगेत उभे राहून आपल्या नंबरची वाट पाहणारे ज्येष्ठ नागरिक तोवर कंटाळून गेलेले असतात. कोणी ज्येष्ठ काही बोलण्यास गेल्यास संबंधित क्लार्क त्यांचेच प्रबोधन करत वेळ घालवत असतो. सातारा बसस्थानकातील वरिष्ठांनी या क्लार्कला शिस्तीचे धडे देवून ज्येष्ठांची कामे तातडीने व वेळेत करुन देण्यास सांगावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

Related posts: