|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ब्लॅकमेल करत संशयिताने लाखो रुपये उकळले

ब्लॅकमेल करत संशयिताने लाखो रुपये उकळले 

व्यापारी हल्ल्यामागे फेसबुक कनेक्शन : महिलेच्या नावाने प्रेंड रिक्वेस्ट : खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा : संशयित राजापूरकुपेरे येथून ताब्यात

प्रतिनिधी / सावंतवाडी:

सावंतवाडी तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष तथा हॉटेल व्यावसायिक जगदीश सहदेव मांजरेकर (61, रा. खासकीलवाडासावंतवाडी) यांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळणाऱया तसेच त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा
प्रयत्न करणाऱया राजापूर तालुक्यातील कुपेरे गावच्या प्रथमेश लवू सावंत (28) याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट काढून त्याने मांजरेकर यांना ब्लॅकमेल केल्याचे उघड झाले आहे. सावंत याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

दरम्यान, प्रथमेश हा गेली चार वर्षे मांजरेकर यांना ब्लॅकमेल करत होता. ब्लॅकमेलिंगच्या अनुषंगाने यापूर्वी जानेवारीपासून दोनवेळा हे प्रकरण सावंतवाडी पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलिसांनी तडजोडीवरच भर दिल्याने सावंतवाडी पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या शहरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

सायबर ऍक्टखाली गुन्हा का नाही?

याप्रकरणी पोलिसांनी सायबर ऍक्टखाली गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. तसे पोलिसांनी केले नाही. सायबर ऍक्टखाली गुन्हा दाखल झाल्यास सावंत याचे अनेक कारनामे उजेडात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर प्रथमेश हा मांजरेकर यांना गेली चार वर्षे ब्लॅकमेल करत पैसे उकळत होता. त्याचा हा प्रताप रत्नागिरी जिल्हय़ातील एक राजकीय पक्षाच्या सतर्कतेमुळे उघड झाला. प्रथमेश हा एका राजकीय पक्षासाठी काम करत असल्याचीही माहिती पुढे येत आहे.

शुक्रवारी रात्री जगदीश मांजरेकर यांना प्रथमेश सावंत याने त्यांच्या घरी जात पेट्रोल अंगावर ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घराचा दरवाजा लाथा मारून तोडला. मांजरेकर यांना वाचविण्यासाठी त्यांचे कुटुंबीय पुढे सरसावले. त्यांनाही प्रथमेश याने धक्काबुक्की केली. यासंदर्भात मांजरेकर यांनी पोलिसांना
तक्रार दिली.

चार वर्षांपूर्वी बनावट फेसबुक अकाऊंट

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, प्रथमेश याने चार वर्षांपूर्वी महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट काढून जगदीश मांजरेकर यांना प्रेंड रिक्वेस्ट पाठविली. ती प्रेंड रिक्वेस्ट मांजरेकर यांनी स्वीकारली. त्यानंतर प्रथमेशने महिलेच्या नावाने चॅटिंग करत मांजरेकर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रथमेश याने मांजरेकर यांना त्यांचे काही फोटो पाठविण्यास सांगितले. त्याला मांजरेकर यांनी नकार दिला. त्यावेळी तुमच्या बायकोला याबाबत सांगतो. समाजात बदनामी करतो, अशी धमकी प्रथमेशने दिली. त्यामुळे मांजरेकर यांनी फेसबुक अकाऊंटद्वारा आपले काही पर्सनल फोटो पाठविले. त्यानंतर या फोटोंच्या आधारे प्रथमेश मांजरेकर यांना ब्लॅकमेल करू लागला. तसेच बदनामीची धमकी देऊ लागला.

बँक खात्यावर वेळोवेळी पैसे भरले

या प्रकरणात बदनामी होऊ नये, यासाठी मांजरेकर यांनी प्रथमेश याच्या मागणीप्रमाणे वेळोवेळी सुमारे 3 ते 4 लाख रुपये त्याने सांगितलेल्या बँक खात्यावर जमा केले. काही दिवसांनी मांजरेकर यांनी प्रथमेशला पैसे देण्याचे बंद केले. त्यामुळे त्याने पुन्हा धमकावण्यास सुरुवात केली. त्यामुळे मांजरेकर यांनी
प्रथमेश याच्याविरोधात सात जानेवारीला पोलिसांत तक्रार अर्ज दिला. त्यावेळी पोलिसांसमोर त्यांच्यात तडजोड झाली. प्रथमेश याने मांजरेकर यांना शिवीगाळ, धमकी, त्रास देणार नसल्याचे लिहून दिले. त्यानंतरही प्रथमेश बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे मांजरेकर यांनी एक मार्चला पुन्हा तक्रार दिली. त्यावेळी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे प्रथमेशला नोटीस बजावली होती. त्यानंतर शुक्रवारी 10 मे रोजी
प्रथमेश याने मांजरेकर यांचे खासकीलवाडा येथील घर गाठत त्यांच्यावर बाटलीतून आणलेले पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर प्रथमेश पसार झाला होता. तो राजापूर तालुक्यातील कुपेरे गावी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी मध्यरात्रीच त्याला जेरबंद करण्यात आले. त्याने गुन्हय़ाची कबुली दिली आहे. त्याला रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

प्रथमेशचे अनेक कारनामे

संशयित प्रथमेश सावंत याचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागले आहे. त्याने अनेकांना अशाप्रकारे जाळय़ात ओढून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु तक्रारी आल्यास सखोल चौकशी केली जाईल. फेसबुक अकाऊंटबाबत खात्री केली जाणार आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर यांनी सांगितले.

सावंतवाडी पोलिसांची भूमिका संशयास्पद

जगदीश मांजरेकर यांनी त्यांच्याबाबत घडत असलेल्या प्रकाराबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोनदा धाव घेतली. तक्रारही दिली. परंतु या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे गांभीर्य सावंतवाडी पोलिसांनी दाखविले नाही. पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे चित्र त्यामुळे निर्माण झाले. मांजरेकर थोडक्यात बचावले असले तरी पोलिसांच्या भूमिकेमुळे त्यांना जीवास मुकावे लागले असते. त्यामुळे हे प्रकरण हलगर्जीपणाने हाताळणाऱया पोलिसांवर कारवाई होणार काय, असा प्रश्न उपस्थित आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनीही या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे. सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या चार पोलिसांना केंद्र व राज्याच्या गृहविभागाने चांगल्या कामाबद्दल पुरस्कार देऊन गौरविले होते. त्या पोलीस ठाण्यात हा प्रकार घडल्याने तो आता चर्चेचा विषय झाला आहे.

रत्नागिरीच्या पुढाऱयामुळे प्रथमेशचे प्रताप समोर

दरम्यान, प्रथमेश सावंत याचे प्रताप रत्नागिरीतील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱयामुळे समोर आले. या पदाधिकाऱयाने मांजरेकर यांना सावध केले. त्यामुळे मांजरेकर यांनी प्रथमेश याला पैसे देण्याचे बंद केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी सायबर ऍक्टखाली गुन्हा दाखल झाल्यास त्याचे कारनामे पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गृहराज्यमंत्र्याच्या शहरातील प्रकार

सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर गृहराज्यमंत्री आहेत. त्यांच्या शहरात एका व्यापारी संघाच्या अध्यक्षाला पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे गृहराज्यमंत्र्याचा पोलिसांवर वचक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केसरकर नागरिकांना नेहमी सुरक्षिततेची हमी देत असतात. परंतु दोनवेळा पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही तिसऱयांदा आरोपीकडून जीवे मारण्याचा प्रयत्न होत असेल तर अशी आश्वासने काय कामाची, असा प्रश्न निर्माण होत आहे.

पोलिसांनी याबाबत सखोल तपास करून प्रथमेश याला कडक शासन होण्याच्यादृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा त्याचे हे प्रताप सुरू राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संशयिताने अशाप्रकारे आणखीही काहीजणांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पोलिसांसमोर सध्या त्याचे एकच प्रकरण असल्याचे सहाय्यक निरीक्षक अण्णासाहेब बाबर यांनी सांगितले.

दोन दिवसाची पोलीस कोठडी

पोलिसांनी संशयित प्रथमेश सावंत याला रविवारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले. न्या. एम. एस. बुधवंत यांनी संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर उपस्थित होते. मांजरेकर यांच्या तक्रारीनंतर संशयित सावंत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी संशयिताच्या राजापूरकुपेरे गावी जात राहत्या घरातून त्याला शनिवारी मध्यरात्री गजाआड केले. तसेच त्याने गुन्हय़ात वापरलेली दुचाकी, गुन्हय़ात वापरलेला मोबाईल तसेच मांजरेकर यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्यास वापरलेली बाटली जप्त केली आहे. संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या दोन दिवसांत अधिक तपास करण्यात येईल, असे निरीक्षक बाबर यांनी सांगितले.

तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी

संशयित प्रथमेश सावंत याने प्रथम ‘विद्या जाधव’ या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट ओपन केले. त्यानंतर तक्रारदार मांजरेकर यांना प्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी चॅटिंग करून जवळीक साधली. त्यांना खासगी फोटो पाठविण्यास भाग पाडले. सदरचे अकाऊंट संशयिताने कशाप्रकारे व कोणत्या इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने ओपन केले, त्या साधनांचा तपास व खासगी फोटो तपासासाठी जप्त करणे आवश्यक आहे. तसेच गेल्या तीन ते चार वर्षापासून मांजरेकर यांना बदनाम करण्यासाठी वेळोवेळी ब्लॅकमेल करून उकळलेली चार लाख रुपये रक्कम संशयिताकडून जप्त करायची आहे. यापूर्वीही संशयिताने धमकी दिली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला लेखी समज दिली होती. असा प्रकार पुन्हा करणार नाही, असे लिहून दिले होते. असे असूनही पुन्हा गंभीर गुन्हा करण्याचा उद्देश काय आहे, याचा तपास करायचा आहे. तसेच त्याच्या घराची झाडाझडती घ्यायची असल्याने पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी तपासी अधिकारी बाबर यांनी न्यायालयात केली. त्यानंतर न्यायालयाने संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.