|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » स्वाभिमानतर्फे मालवणात ‘सकल मच्छीमार एल्गार मेळावा’

स्वाभिमानतर्फे मालवणात ‘सकल मच्छीमार एल्गार मेळावा’ 

दांडी झालझुल मैदानावर 21 रोजी आयोजन

प्रतिनिधी / मालवण:

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे सकल मच्छीमार एल्गार मेळावा 21 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता झालझुल मैदान, दांडी येथे आयोजित केला आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी, परप्रांतीय घुसखोरी अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी हा एल्गार मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी दिली.

या मेळाव्याला खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे हे मार्गदर्शन करणार आहेत, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेकडून मच्छीमारांचा विश्वासघात!

समुद्राचा आशीर्वाद घेऊन कित्येक संकटांना तोंड देत मच्छीमारी करून उदरनिर्वाह करणारे मच्छीमार खरे जिगरबाज सागरपुत्र आहेत. पिढय़ानपिढय़ा त्यांची नाळ या भूमीशी आणि या समुद्राशी जोडलेली आहे. पण आज या लढाऊ मच्छीमारांची काय अवस्था आहे? ते सुखात आहेत काय? पाच वर्षांपूर्वी ज्या पक्षावर आपण विश्वास टाकला आणि आमदार, खासदार निवडून दिले, त्या पक्षाने म्हणजे शिवसेनेने त्यांच्या आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी मच्छीमारांचा विश्वासघात केला नाही काय? शाश्वत मच्छीमारीसाठी मच्छीमार सारेच लढत असताना या लोकप्रतिनिधींनी आणि सेनेने त्यांची खरीखुरी साथ दिली नाही. हीच सर्व मच्छीमारांची भावना आहे. आज एलईडी मच्छीमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी, हायस्पीड ट्रॉलर्सची मच्छीमारी यांनी मच्छीमार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. या राक्षसी मच्छीमारीमुळे समुद्रच भकास होणार की काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशी राक्षसी मासेमारी करून मत्स्यसाठे आता संपलेले असताना परराज्यातील ट्रॉलर्स आमच्या विध्वंसासाठी समुद्रात घुसखोरी करीत आहेत. एलईडी मासेमारीमुळे सर्व मच्छीमार भयभीत झाले आहेत. मच्छीमारांचे भविष्य आणि भवितव्य संपवायला हे सर्वजण निघाले आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष याच्या स्पष्टपणे आणि निकराने विरोधात आहे, असेही सामंत म्हणाले.

मच्छीमारांच्या पाठिशी स्वाभिमान पक्ष!

खासदार नारायण राणे आणि या जिल्हय़ातील मच्छीमारांचे गेल्या 30 वर्षांपासूनचे अतूट नाते आहे. मच्छीमारांनी हाक मारली आणि राणे मदतीला धावले नाहीत, असे कधीही झाले नाही. फयानचे वादळ असो किंवा इतर आपत्ती असो. पण मधल्या काळात काही गैरसमज जाणीवपूर्वक पसरविण्यात आले. अफवा पसरविण्यात आल्या आणि या 30 वर्षांच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा घृणास्पद प्रयत्न विरोधकांनी केला. पण असे कधीही घडू शकत नाही, की राणे कुटुंब आणि मच्छीमार यांच्यात जास्त काळ दरी पडूच शकत नाही. म्हणूनच आमदार नितेश राणे यांनी मच्छीमारांच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेतली. मच्छीमारांसाठी त्यांनी केसेसही पत्करल्या. बांगडाफेक आंदोलन महाराष्ट्रभर गाजले. नीलेश राणे यांनी मच्छीमारांच्या प्रश्नांवर मोर्चा काढून त्यांच्यावरील अन्यायाविरोधात आवाज उठवला. आज पाच वर्षांनी दूध का दूध आणि पानी का पानी झाले आहे. राणे नेहमीच मच्छीमारांचेच होते आणि मच्छीमारांचेच राहतील, याच भूमिकेतून कोणतीही निवडणूक नसताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने सकल मच्छीमार एल्गार मेळाव्याचे मालवण दांडी येथील झालझुल मैदानावर आयोजन केले आहे, असेही सामंत यांनी सांगितले.