|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गेट उघडून हत्तींचा बागायतीत प्रवेश

गेट उघडून हत्तींचा बागायतीत प्रवेश 

सोनावलला दिवसाढवळय़ा धुडगूस : ग्रामस्थांत भीतीचे वातावरण : वन विभागाला दिली कल्पना

प्रतिनिधी / दोडामार्ग:

एरव्ही हेवाळे गावातील जंगलात असणाऱया रानटी हत्तींच्या कळपाने नव्या गावात आपली एंट्री केली आहे. महत्वाचे म्हणजे या सोनावल गावात बागायतीचे गेट उघडून दिवसाच शेती बागायतीची मोठी हानी केली आहे. याबाबत सरपंच प्रियंका सोनवलकर यांनी दोडामार्ग वनविभागास कल्पना दिली. दिवसा येऊन हत्तींनी केलेल्या नुकसानीमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हत्तींच्या कळपाला पकडण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

तिलारी खोऱयातील हेवाळे, बांबर्डे, खराडी आदी भागात रानटी हत्तींचा वावर मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. साधारण 2002 पासून हत्ती या भागात आहेत. येथील शेतकरी बागायतदार हत्तींकडून होत असलेल्या नुकसानीमुळे हैराण झाले आहेत. वनविभागाकडे हत्ती पकड मोहीम राबविण्याची मागणी असताना वनविभाग मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देत आहे. दोरखंड, चर, मिरचीपूड सारख्या मोहीम अयशस्वी ठरल्या. परिणामी प्रतिदिन नुकसान सुरूच आहे.

सोनावलमध्ये दिवसा नुकसान

एरव्ही रात्रीच्यावेळी नुकसान करणारे रानटी हत्ती सोनावल गावात रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान दाखल झाले. गावातील रघुनाथ सोनवलकर, रवींद्र सोनवलकर, वसंत सोनवलकर, शिवराम गवस, मधुकर गवस यांच्या बागायतीतील केळी, माड आदींचे मोठे नुकसान केले. ग्रामस्थ पोहचेपर्यंत हत्तींनी आपला मोर्चा तिलारी जंगलाच्या दिशेने वळविला होता. मात्र, दिवसा केलेल्या नुकसानीमुळे सध्या सोनावल गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हत्तींचा गेट उघडून आत प्रवेश

हत्ती हा अत्यंत हुशार प्राणी समजला जातो. याचा अनुभव या नुकसानीदरम्यान आला. रघुनाथ सोनवलकर यांच्या बागायतीच्या कुंपणाला लोखंडी गेट लावण्यात आली आहे. हत्तींनी या बागायतीत प्रवेश करताना लोखंडी गेट उघडून आत प्रवेश करीत बागातीतील माड, केळींचे नुकसान केले.

घोटगेवाडीत पुन्हा हत्तींकडून नुकसान

सोनावल येथे रविवारी सायंकाळी काही हत्ती तिलारी तर काही घोटगेवाडी गावात पोहोचले. घोटगेवाडी गावात काही दिवसांपूर्वी रानटी हत्ती दाखल झाले होते. त्यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने हत्तींना पिटळण्यात आले. घोटगेवाडी हे गाव केळी, माड, फणस आदी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या गावात हत्ती रोखण्यासाठी उपसरपंच भालचंद्र कुडव यांनी गस्तीपथक नेमण्याची मागणी केली होती. मात्र, गस्तीपथकात काम करणाऱया ग्रामस्थांचा मोबदला वनविभागाने अद्याप दिलेला नाही. आता रविवारी रात्री पुन्हा एकदा हत्ती घोटगेवाडीत दाखल झाले व पांडुरंग शंकर कवठणकर, विठ्ठल बाबाजी दळवी यांच्या माड, फणस बागायतीचे मोठे नुकसान केले. आता वनविभागाने स्वतःचे कर्मचारी आणून गस्तीपथक नेमावे. जर पुन्हा शेतकऱयांचे नुकसान झाले तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपसरपंच कुडव यांनी दिला आहे.