|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘कोयने’त उद्दिष्टापेक्षाही अधिक वीजनिर्मिती!

‘कोयने’त उद्दिष्टापेक्षाही अधिक वीजनिर्मिती! 

प्रतिनिधी/ चिपळूण

कोयना पाणीसाठय़ासह जलविद्युत प्रकल्पातून यावर्षी वीजनिर्मितीचे योग्यप्रकारे नियोजन केले गेल्याने राज्यावरील वीज भारनियमनाचे संकट टळले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या उद्दिष्टापैकी अधिक वीजनिर्मिती केली गेली असून कोयनेच्या चारही टप्प्यात सर्वाधिक वीजनिर्मिती पोफळी वीजगृहाने केली आहे. आतापर्यंत 881.620 दशलक्ष युनिट अशी सर्वाधिक वीज निर्मिती केली असल्याची माहिती येथील सूत्रांकडून देण्यात आली.

   सध्या उन्हाळय़ाच्या झळा अधिक तीव्र असून अंगाची लाही लाही होत आहे. राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थितीही निर्माण झाली आहे. असे असताना  कोयना जलविद्युत केंद्राने यावर्षी वीज निर्मितीचे योग्य नियोजन करून भारनियमनाचा प्रश्न निकालात लावला आहे. कोयना जलविद्युत केंद्रात चार टप्पे असून पहिल्या व दुसऱया टप्प्यात 600 मेगावॅट वीजनिर्मिती होते, तर तिसऱया टप्प्यात 320 व चौथ्या टप्प्यात 1000 व कोयना धरण पायथ्याला 36 मेगावॅट अशी एकूण 1956 मेगावॅट वीजनिर्मिती होते. यावर्षी टप्पा क्र. 1 मधून 1025, टप्पा 3 मधून 505, टप्पा 4 मधून 1043 आणि धरण पायथा येथून 196 अशी एकूण 2769 दशलक्ष युनिट इतकी वीजनिर्मिती झाली आहे. राज्यावरील भारनियमन संकट टळावे यासाठी 1 जून ते 31 मे या तांत्रिक वर्षात पाण्याबरोबर वीजनिर्मितीचे योग्य नियोजन केले जाते आणि त्यानुसार
वीजनिर्मिती करून भारनियमनचा प्रश्न मार्गी लावला जातो. आतापर्यंत सर्वाधिक वीजनिर्मिती पोफळी वीजगृहाने केली आहे.

   केंद्र सरकारच्या केंद्रिय ऊर्जामंत्र्यांनी सन 2018 ते 2019 पर्यत कोयना जलविद्युत केंद्राला 2700 दशलक्ष युनिट एवढी वीज निर्मिती करण्याचे टार्गेट दिले होते. मात्र कोयना जलविद्युत केंद्राने 2769 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती उद्दिष्टापेक्षा अधिक केली. त्यामुळे केंद्रिय ऊर्जामंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले, तर सन 2019 ते 2020 या चालू वर्षासाठी 3000 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने कोयना जलविद्युत केंद्राला दिले आहे. त्यापैकी गेल्या एप्रिल महिन्यात 530 दशलक्ष युनिट व चालू मे महिन्यात 11 मेपर्यत 408 दशलक्ष युनिट इतकी वीजनिर्मिती झाली आहे. धरणात अजूनही 30 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षीसुद्धा केंद्र सरकारने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वीजनिर्मिती करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

  कोयना धरण पायथ्याशी 36 मेगावॅट वीजनिर्मिती करून त्याचे पाणी पूर्वेकडे म्हणजे कराड, सांगलीकडे सिंचनासाठी वळवले जाते. यावर्षी 1 जूनपासून आतापर्यंत पूर्वेला एकूण 39.57 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पूर्वेकडे सिंचनासाठी तब्बल 12.39 टीएमसी जादा पाणी सोडण्यात आले आहे. यातील रिव्हर्स दरवाजातून सोडण्यात आलेले 2.49 टीएमसी पाणी वगळता अन्य 37.08 टीएमसी पाण्यावर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 176.242 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. सद्यस्थितीत कोयना वीज निर्मिती केंद्रात मोठय़ाप्रमाणात वीज निर्मिती होत आहे. पाण्याचे नियोजन योग्यपद्धतीने करून वीज निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारनियमन (लोडशेडिंग) दिसून येत नाही. त्यामुळे यावर्षी भारनियमनाचा प्रश्न मार्गी लावू शकलो, अशी माहिती कोयना जलविद्युत केंद्र प्रशासनाने दिली.