|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कोडोलीतील तिघांवर मोक्काची कारवाई

कोडोलीतील तिघांवर मोक्काची कारवाई 

प्रतिनिधी/ सातारा

कोडोली परिसरात दहशत माजवणाऱया तिघांच्या टोळीवर संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली. निकेत पाटणकर व गुंडय़ा कापले अशी दोन संशयित आरोपींची नावे असून सध्या ते अटकेत आहेत. संशयितांवर एकूण 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

निकेत वसंत पाटणकर (वय 25, रा. कोडोली) व आकाश उर्फ गुंडय़ा ज्ञानेश्वर कापले (वय 23, रा. कोडोली) या दोघांवर मोक्का लावण्यात आला असून सध्या ते अटकेत आहेत. त्यांच्या आणखी एका साथीदाराचा सहभाग असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, निकेत पाटणकर हा कोडोली परिसरात गुंडगिरी करत आहे. त्याच्याविरुध्द आतापर्यंत 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत. निकेतचा साथीदार गुंडय़ा कापले याच्याविरुध्दही 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे दोघेजण आणखी एका त्याच्या साथीदारासोबत टोळी करुन परिसरात धुडगूस घालत आहेत. या तिघांच्या टोळीने 5 एप्रिल रोजी कोडोली येथे रात्री एका युवकाचा रस्ता अडवला होता. संशयितांनी सायकलवरील युवकाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

शहर पोलीस या गुन्हय़ाचा तपास करत असताना त्यांना गुन्हय़ाची खात्री पटली. तत्काळ याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हय़ाची सत्यता पडताळून मोक्काचा प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवला. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून तो कोल्हापूर येथील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला पाठवला असता तो मंजूर करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी यावर कार्यवाही करण्यात आली. 

ज्यांची कारकीर्द गुन्हेगारीची त्यांना मोक्का

जिल्हय़ातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जनतेला निर्भयपणे जीवन व्यतित करता यावे यासाठी पोलीस दल काम करते. मोक्का ही पोलिसांच्या रुटीन कारवाईचा भाग आहे. ज्यावेळी एखादे गुन्हेगार टोळी करुन दहा वर्षे तरी विविध गुन्हय़ात सहभागी आहेत व स्वतःच्या फायद्यासाठी टोळी करुन आर्थिक फायदा करुन घेतात व दहशत निर्माण करतात अशांचे प्रस्ताव मोक्कासाठी पाठवण्यात येतात. ही कारवाई त्याचाच एक भाग आहे. अशा गोष्टींवर आमचे लक्ष असते. यापुढे देखील जे जे अशा कारवाईसाठी पात्र ठरतील त्यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात येतील.

तेजस्वी सातपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक, सातारा