|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारा शहर परिसरात चोरटय़ांकडून साडेचार लाखाची चोरी

सातारा शहर परिसरात चोरटय़ांकडून साडेचार लाखाची चोरी 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहर व परिसरात चोरटय़ांकडून सुरु असलेले चोऱयांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नसून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मंगळवार पेठेतील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमधून व शहरानजीक असलेल्या कोंडवे (ता. सातारा) येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटय़ांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाखाचा ऐवज लंपास केला असून दोन्ही घटनांची नोंद शाहूपुरी व सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार पेठेतील बालाजीनगर अपार्टमेंटमधील फ्लॅटमधून सोन्या-चांदीचे दागिन्यांसह 3 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अजिंक्य एजन्सीमधील इलेक्ट्रिक फिटिंग व एसी सर्व्हिसिंगचे कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सुवर्णा विश्वास देशपांडे (वय 48, रा. बालाजीनगर अपार्टमेंट, मंगळवार पेठ, सातारा) यांच्या घरात इलेक्ट्रिक फिटिंग व एसी सर्व्हिसिंगचे काम सुरू होते. दि. 10 रोजी उघडय़ा घरातील बेडरुममधील ड्रेसिंगच्या कप्प्यातून सोन्याच्या पाटल्या, मंगळसूत्र, अंगठी, मिनीगंठण, पेन्डेट, टॉप्स, चांदीचे पैंजण, जोडवी असा एकूण 3 लाख 83 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

तर कोंडवे, ता. सातारा येथे झालेल्या चोरीच्या घटनेत अज्ञात चोरटय़ांनी 60 हजार 400 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत शंकर सोनबा इंगळे वय 72 रा. कोंडवे, ता. सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंगळे व त्यांचे कुटुंबिय रात्री जेवणानंतर उकडत असल्याने राहत्या घराला कुलूप लावून घराबाहेर अंगणात झोपले होते. झोपताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटय़ांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करुन सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 60 हजार 400 रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हवालदार एल. बी. जाधव अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, सातारा शहरालगत उपनगरातील सैदापूर व कोंडवे येथे चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. ही घटना मंगळवारी समोर आल्यानंतर त्या त्या ठिकाणी ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. चोरटय़ांनी या परिसरातून 7 ते 8 तोळे सोन्याचा ऐवज लांबवलेला आहे. याशिवाय अनेकठिकाणी चोरीचे प्रयत्नही झाले आहेत. सातारा तालुका पोलीस माहिती घेवून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवत होते.