|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » तिघांना मारहाण, गाडय़ांची तोडफोड

तिघांना मारहाण, गाडय़ांची तोडफोड 

प्रतिनिधी/ कराड

मुनावळे (ता. कराड) येथे रात्री उशिरा गाडीतील टेप लावून नाचण्याच्या कारणावरून राडा झाल्याचा प्रकार सोमवारी घडला. चार चाकीसह दुचाकी वाहनांची तोडफोड करत लोखंडी गज, हॉकी स्टिक व लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले. मारहाणीत जखमी झालेल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी कराड ग्रामीण पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

दत्ता कोळेकर (रा. मुनावळे, ता. कराड) व सचिन घाडगे (रा. कालेटेक, ता कराड) यांच्यासह इतर चार जणांवर गुन्हा दाखल आहे. संशयितांच्या मारहाणीत रोहित कमलाकर यादव हा गंभीर जखमी झाला असून त्याचा भाऊ योगेंद्र कमलाकर यादव (वय 27, रा. नारायणवाडी, ता. कराड) व आणखी एक किरकोळ जखमी आहेत. 

   पोलिसांनी दिलेली माहिती अशी, योगेंद्र व रोहित यांचे मुंबई व कराड येथील मित्र मुनावळे गावच्या हद्दीतील दरे नावाच्या शिवारात जेवण करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी चारचाकी वाहनातील टेप लावला होता. भोवती त्यांचे मित्र नाचत होते. दरम्यान, रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हे सर्व जण मित्र जेवण करीत असताना दत्ता कोळेकर व सचिन घाडगे यांच्यासह आणखी अनोळखी चौघेजण तेथे आले. त्यांनी एवढय़ा रात्री टेपचा आवाज कशाला मोठा केला आहे. तुम्हाला आता जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून लोखंडी रॉड, लाकडी दांडके व हॉकी स्टिकने रोहित यादव व योगेंद्र यादव यांच्यासह त्यांच्या मित्रांना जबर मारहाण केली. यामध्ये तिघे जण जखमी झाले असून असून रोहित यादव हा गंभीर आहे. त्यानंतर संशयितांनी तेथील चार चाकी व दोन चाकी वाहनांचीही तोडफोड करून ते सर्वजण तिथून पळून गेले. 

  दरम्यान, संशयितांनी केलेल्या मारहाणीत रोहित यादव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला योगेंद्रसह त्याच्या मित्रांनी कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. योगेंद्र यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्ता कोळेकर व सचिन घाडगे यांच्यासह आणखी चौघांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विजया वंजारी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, दत्ता कोळेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कराड शहर तसेच इतर पोलीस ठाण्यामध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. कराड तालुका पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संशयितांचा शोध घेतला असता ते पळून गेले. दरम्यान, पोलिसांनी संशयितांना मदत करणाऱया दोघांना मध्यरात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.