|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भारतीय संस्कृतीत दशावतारास फार महत्व

भारतीय संस्कृतीत दशावतारास फार महत्व 

प्रतिनिधी/ सांखळी

 आपल्या संस्कृतीमध्ये दशावताराची भूमिका महत्वाची आहे. प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो. ही नाटय़कृती देवतेला संतुष्ठ करण्यासाठी असते. गोवा, पुणे आणि बनारस येथे संकासूरला खूप महत्व आहे. भारतीय संस्कृतीत दशावतारास फार महत्व आहे. दशावतारी नाटक पाहण्यासाठी संधी नव्हे तर भाग्य प्राप्त व्हावे लागते, असे उद्गार लोकसाहित्याचे अभ्यासक विनायक खेडेकर यांनी काढले.

ज्ञानदीप गोवा यांनी आयोजित केलेल्या आणि लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटीने प्रायोजित केलेल्या दशावतारी नाटय़ महोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ात ते बोलत होते. पाच दिवस चालणाऱया या दशावतारी नाटय़महोत्सवाचे काल मंगळवारी सायंकाळी रवींद्र भवनात उद्घाटन झाले. या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर यांचे अभिनंदन केले.

लोकमान्यचे व्यवस्थापक अधिकारी अँथॉनी आझावेदो, सुहास खांडेपारकर, रामकृष्ण पिळगावकर यांची उपस्थिती होती. प्रणाली काणेकर, आत्माराम नाईक, रवी पाटील, अनुराधा सावंत, प्रताप देसाई, सिताराम काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. प्रसंगी लोकमान्यच्या कर्मचारी पल्लवी च्यारी व सहकाऱयांनी रवींद्र भवनात रेखाटलेली रांगोळी खास आकर्षण ठरली.

ज्ञानदीप गोवातर्फे मान्यवरांचा सन्मान

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सांखळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, लोकसाहित्याचे अभ्यासक विनायक खेडेकर, श्रीपाद आर्लेकर, आजगावकर यांचा ज्ञानदीप गोवातर्फे स्मृतीचिन्ह तसेच शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

सांखळी दशावतारी नाटय़कलेचे केंद्र : जावडेकर

 सांखळीतील ग्रामीण भाग हा दशावतारी नाटय़कलेचे केंद्र असून अनेक वर्षापासून येथील कष्टकरी कलाकार ही नाटय़ परंपरा जपत आले आहेत. किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ज्ञानदीप गोवा ही संस्था आणि सहकाऱयांच्या मदतीने हा दशावतारी नाटय़महोत्सव पुढील चार दिवस चालणार आहे. लोकजागृती, संस्कृतीचे जतन करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. त्यासाठी नाटय़प्रेमींच्या सहकार्याचीही गरज आहे, असे मत ज्ञानदीपचे सचिव सागर जावडेकर यांनी व्यक्त केले.

सांखळीवासियांतर्फे किरण ठाकुर यांचे अभिनंदन : सगलानी

सांखळीतील कलाकारांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी किरण ठाकुर यांनी शहरात अनेक सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रम राबविले आहेत. रामायण, महाभारत, तसेच विविध पौराणिक कथेतून दशावतारी नाटय़कृती निर्माण होत आहे. मात्र या कलेकडे युवा वर्गाने वळण्याची गरज आहे. ज्ञानदीप गोवा संस्थेला सांखळी पालिकेचे नेहमी सहकार्य असेल, असे मत नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राघोबा पेडणेकर यांनी केले तर सीताराम काळे यांनी आभार मानले.