|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यातील धरणांमध्ये मुबलक जलसाठा

राज्यातील धरणांमध्ये मुबलक जलसाठा 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील सर्व धरणांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी आवश्यक तेवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे जलस्रोत खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी स्पष्ट केले आहे. गोव्याचे प्रमुख धरण असलेल्या साळावली धरणामध्ये 80 दिवस पुरेल एवढे पाणी आहे. अंजुणे धरणात 40 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

आमठाणे, पंचवाडी आणि चापोली धरणात आवश्यक तेवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र खांडेपार नदीतील पाणी कमी झाल्याने काही प्रमाणात ओपा पाणी प्रक्रिया प्रकल्पावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासंदंर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. खांडेपार नदीच्या पात्रातील पाण्याची उचल करून ते पाणी ओपा प्रकल्पासाठी वापरले जाते. मात्र नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने समस्या निर्माण झाली आहे. जलस्रोत खाते त्यासाठी पूर्णवेळ कार्यरत आहे. ओपा प्रकल्पाला दर दिवशी 140 एमएलडी कच्चे पाणी पुरविण्यावर भर दिला जात आहे.

खाण पिटातील पाण्याचा वापर

सध्या गांजे नदीतून 30 एमएलडी व साळावलीतून 40 एमएलडी पाण्याची उचल केली जाते. नदीच्या पात्रातील पाणी खालावल्याने सध्या जलस्रोत खाते  खाण पिटात उपलब्ध असलेले पाणी उचल करून ते खांडेपार नदीच्या पात्रात सोडले जात आहे. सांतोण, कोडली आणि दाभाळ येथील खाण पिटातून 55 एमएलडी पाणी खांडेपार नदीत सोडले जात आहे.

पाणी उपशासाठी आणखी पंप मागविणार

पाणी उपसा करणारे पंप मागवून ते अन्य पिटातील पाणी उपसण्यासाठी वापरले जाणार आहे. काल झालेल्या जलस्रोत आणि साबांखाच्या उच्चस्तरिय बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. पावसाळा सुरू होईपर्यंत पुरेल एवढा साठा गोव्यातील धरणांमध्ये उपलब्ध आहे.

धारबांदोडा खाण पिटामध्ये भरपूर पाणी

ओपा प्रकल्पातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी धारबांदोडा तालुक्यातील खाणीच्या खंदकातून पाणी खेचण्यात येत आहे. पाण्याची टंचाई भासू नये यासाठी सेझा गोवाच्या कोडली खाणीवरून दररोज सुमारे 20 दशलक्ष लीटर तर अन्य एका बंद खाणीच्या खंदकांतून 25 दशलक्ष लीटर पाणी खेचले जात आहे. सातोण-दाभाळ येथील झारापकर खाणीच्या खंदकातून 25 दशलक्ष पाणी खेचले जात आहे. दर दिवशी खाण पिटातील पाणी खेचून जवळच्या नदीत सोडले जात आहे. खाणीत पावसाळय़ात साठलेले पाणी खेचून फोंडा व तिसवाडी तालुक्यांना पाणी पुरवठा केला जात आहे.