|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विजापूर-अथणी मार्गावर अपघातात चौघे ठार

विजापूर-अथणी मार्गावर अपघातात चौघे ठार 

विजापूर/वार्ताहर

भरधाव ट्रकने दोन दुचाकींना जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील चौघे जागीच ठार झाले. सदर घटना मंगळवार 14 रोजी दुपारी विजापूर-अथणी मार्गावरील हिटळ्ळी पेट्रोल पंपाजवळ घडली. अनिल सिद्धप्पा कासट्टी, नबीबसाब हुसेनसाब हळ्ळी, मन्सूर नाईकोडी (वय 55), पूरसिद्धप्पा मळगोड (60 सर्व. रा. तोरवी, ता. विजापूर) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करून ट्रक ताब्यात घेतला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, मंगळवार दुपारी अनिल कासट्टी, नबीबसाब हळ्ळी, मन्सूर नाईकोडी, पूरसिद्धप्पा मळगोड हे दुचाकीने (केए/28/ईबी/3359) कामानिमित्त विजापूरला आले होते. आपले काम आटोपून चौघेही तोरवी या आपल्या गावी जात होते. त्यावेळी विजापूरहून अथणीकडे ट्रक (एमएच 11/एम/6773) जात होता. दरम्यान तिन्ही वाहने हिटळ्ळी पेट्रोलपंपानजीक आली असता भरधाव ट्रकने समोरील दोन्ही दुचाकींना मागून जोराची धडक दिली. यात चौघेही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक चालकाला पकडून बेदम चोप दिला. तसेच याची माहिती विजापूर वाहतूक पोलिसांना दिली. याची माहिती मिळताच पीएसआय लिंगाप्पा पुजारी सहकाऱयांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विजापूर सरकारी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तसेच ट्रक ताब्यात घेऊन चालकाला अटक करण्यात आली. या घटनेची नोंद विजापूर वाहतूक पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.