|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कौलव येथील जाधव कुटुंबाला मिळाला आधारवड

कौलव येथील जाधव कुटुंबाला मिळाला आधारवड 

वार्ताहर/ कौलव

लहान मुलांचा टाहो, घरची परिस्थिती दयनीय, वडील वार्धक्यात, पत्नीचा आधारवड गेला अशा कठीण परिस्थितीत फक्त सांत्वन करणारी मंडळी अनेक भेटतात. मात्र आर्थिक मदत देणारे दुर्मिळच. संपूर्ण कुटुंब दुःखाच्या शोकसागरात बुडालेले, दुःख विसरून पुढे काय करावयाचे या शोकाकुल मनःस्थितीत असलेल्या कुटुंबाला उद्योगपती चंद्रकांत पाटील कौलवकर यांचा आर्थिक आधार मिळाला आहे. दुःखाच्या प्रसंगी आर्थिक मदत देऊन कौलव (ता.राधानगरी) येथील एका गरीब कुटुंबाला खंबीर आधार दिला आहे.

याबाबत हकीकत अशी, कौलव येथील कृष्णात हरी जाधव (वय 36) हा युवक कोल्हापूर येथील खाजगी कंपनीत नोकरी करत होता. गेल्या महिन्यात लिफ्ट दुरुस्तीची कामे घेत होता. आपली पत्नी, लहान दोन मुले आणि वडील असे पाचजण कृष्णात उर्फ पिंटूच्या मिळकतीवर गुजरान करत होते. कसा बसा संसार चालू असताना नियतीची दृष्ट लागली. काळाने डाव साधला. कोल्हापूरकडे कामावर जात असताना राधानगरीकडे येणारा मालवाहू ट्रकचा स्पिन्डल तुटला आणि कौलव गावातील पिंटू जाधव यांच्यासह अन्य दोघे जखमी झाले. पहिले दोन दिवस पिंटूला जादा लागलेले नाही लवकरच बरा होईल अशी अपेक्षा लोकांना वाटत होती. पण पिंटुच्या छातीच्या बरगडी तुटून फुफुसात घुसल्या होत्या. यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव, फुफुसाला संसर्ग बळावला. कोल्हापूरच्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. घरामध्ये होते नव्हते ते पैसे संपलेत. अनेक लोकांकडून हात उसने पैसे घेत उपचार सुरु होते. शेवटी या युवकाची प्राण ज्योत मालवली. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या कुटुंबाला सावरणारे कोण? अशा कठीण परिस्थितीत आधार देण्यासाठी कोण येईना.

यावेळी कौलव गावचे उद्योगपती दानशूर व्यक्तिमत्व चंद्रकांत पाटील कौलवकर पुढे आले आणि पिंटू जाधव यांच्या लहान मुलांना, पत्नीला आणि वडीलास आर्थिक मदत म्हणून रोख रक्कम दहा हजार रुपये दिली. शिवाय लहान दोन चिमुरडय़ांना आणखी मदत देणार आहे अशी ग्वाही दिली. या मदतीमुळे आणि मायेचा आधार दिल्याने जाधव कुटुंबाचे दुःख हालके झाले आहे. अतिशय शोकाकुल अवस्थेत असताना चंद्रकांत पाटील यांची आर्थिक मदत जाधव कुटुंबाला लाख मोलाची ठरली आहे. याच अपघातातील दुसरे जखमी दत्तात्रय ऱहाटोळे यांच्याही घरी जाऊनही आर्थिक मदत चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मदती बद्दल चंद्रकांत पाटील यांच्या दातृत्वाचे कौतुक सर्वत्र केले जात आहे. आर्थिक मदत वाटप प्रसंगी दीपक चरापले, हरी जाधव, रमेश कोल्हापुरी, संभाजी पाटील, शिवाजी पाटील, आंबाजी पाटील, राष्ट्रीय जलतरण कोच अजित पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील आदी मंडळी उपस्थित होती.