|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पित्रोदा-अय्यरांवर टीकास्त्र

पित्रोदा-अय्यरांवर टीकास्त्र 

नामदाराला वाचविण्यासाठी दोन दरबारी मैदानात :

  वृत्तसंस्था/ पाटणा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बिहारच्या पालीगंज आणि झारखंडच्या देवघरमध्ये प्रचारसभेला संबोधित केले. देवघरमध्ये बोलताना त्यांनी काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि मणिशंकर अय्यर यांच्यावर शरसंधान केले. नामदार (राहुल गांधी) परिवाराच्या दोन सर्वात जवळच्या दरबाऱयांनी स्वतःची फलंदाजी सुरू केली आहे. एक फलंदाज नामदाराचा गुरु असून त्याला यापूर्वीच मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यानी शिखांची क्रूर चेष्टा करत नरसंहार झाला तर झाला असे म्हटले आहे. दुसरा फलंदाज गुजरात निवडणुकीनंतर मैदानापासून दूर होता. तोही दोन दिवसांपासून मैदानात असून मला जोरदार शिव्या देतोय. काँग्रेसमध्ये नखं कापून हुतात्मा होण्याची चढाओढ सुरू असल्याची बोचरी टीका मोदींनी केली आहे.

23 मे रोजी येणाऱया निकालांची जाणीव काँग्रेसला झाली आहे. निकालांची तयारीही काँग्रेसने चालविली आहे. पराभवाचे खापर कुणावर फोडावे याची तयारी काँग्रेस करत आहे. नामदाराला वाचविण्यासाठी काय केले जावे याचा सराव केला जात असल्याचे मोदी म्हणाले.

विरोधकांना केवळ कुटुंबाची चिंता

आतापर्यंतच्या निवडणुकीमुळे महाभेसळवाल्यांची स्वप्ने भंगली आहेत. त्यांना केवळ कुटुंबाची चिंता आहे. नामदार असो किंवा बिहारचे भ्रष्ट कुटुंब त्यांना गरीबाची चिंता असती तर घोटाळा करण्यापूर्वी त्यांचे हात कापले असते. शेकडो एकर जमीन हडपल्यावरून त्यांचे डोळे केवळ चोरीचा माल प्राप्त करण्यासाठी उघडत असल्याचा शब्दप्रहार मोदींनी केला आहे.

रालोआच सत्तेवर येणार

4-5 टप्प्यांच्या मतदानानंतर सर्व सर्वेक्षणांमध्ये रालोआचे सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले जात आहे. महाभेसळ आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीत मजबूर सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले होते. पण त्यांचे मनसुबे धूळीस मिळाले आहेत. त्यांच्या नकारात्मक प्रचारात मोदीची प्रतिमा मलीन करणे आणि मोदीला हटविणे हेच दोन मुद्दे असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

महाभेसळयुक्त आघाडीच्या नेत्यांनी नेहमीच कौटुंबिय स्वार्थाला महत्त्व देत राष्ट्रीय सुरक्षेकडे डोळेझाक केली आहे. नामदार तसेच बिहारमधील भ्रष्ट कुटुंबाची मालमत्ता आज हजारो कोटी रुपयांमध्ये आहे. हे पैसे कुठून आले? गरीब हा  त्यांच्यासाठी केवळ घोकंपट्टी केलेला शब्द आहे. या लोकांना केवळ प्रशंसा ऐकण्याची सवय आहे. दरबाऱयांची फौज गुणगान करून त्यांचा अहंकार वाढवत असल्याचे मोदी म्हणाले.

सुदर्शन चक्र धारण करणार

महाभेसळवाल्यांनी देशाच्या सुरक्षेच्या दुर्लक्ष केले होते. 2014 पूर्वी दहशतवादी कुठेही हल्ले करायचे आणि काँग्रेसचे नेते केवळ वक्तव्ये करत बसायचे. पण तुमच्या या चौकीदाराने पाकिस्तानकडून होणारे वार सहन करण्यास नकार दिला. जवानांना मुक्तहस्त देत दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गरज भासल्यास भारत भगवान कृष्णाप्रमाणे दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी सुदर्शन चक्र धारण करणार असल्याचे मोदी म्हणाले.

 

सत्ता गमाविण्याच्या भीतीने ममता अस्वस्थ

कोलकात्यात झालेल्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बशीरघाटमध्ये सभेला संबोधित केले आहे. या सभेत मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला आहे. दीदींची अस्वस्थता आणि जनसमर्थन पाहून भाजप यंदा 300 च्या पुढे जाणार असल्याचे मी म्हणू शकतो. दीदींची सत्ता जाणार असल्याचा आवाज आज पूर्ण बंगालमधून उठत असल्यानेच त्या बिथरल्याचे मोदी म्हणाले.

ममतादीदींनी बंगालच्या परंपरा पायदळी तुडवल्या आहेत. त्यांना आता स्वतःच्या सावलीचीही भीती वाटू लागली असून पायाखालील जमीन सरकल्याचे त्यांना कळून चुकले आहे. बंगाल आणि देशभरात भाजप स्वबळावर बहुमत प्राप्त करणार आहे. बंगालच्या लोकांना धोका देऊन, घाबरवून आणि धमकावून राज्य करत राहू असे ममता बॅनर्जींना वाटत होते. पण रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रविंद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस यासारख्या महापुरुषांची असलेली ही भूमी ममतादीदींना सहन करणार नसल्याचे मोदी म्हणाले.

ममता बॅनर्जींना सत्तेतून हाकलण्याचा निर्धार बंगालच्या जनतेने केला आहे. सत्ता गमाविण्याच्या भीतीमुळे ममतांचा संताप होणे स्वाभाविकच आहे. बंगालच्या दोन मुलींनी प्रश्न विचारल्याने 4-5 वर्षांपूर्वी ममतांनी संताप दाखवून दिला होता. दीदींना आज पुन्हा एकदा बंगालच्या मुलीवर संताप आला असून तिला तुरुंगात डांबले आहे. एका छायाचित्रासाठी इतका संताप? ममता बॅनर्जी या स्वतः चित्रकार असून त्यांची चित्रे कोटय़वधीत विकली जातात. ममतांनी माझे विकृत चित्र तयार करावे आणि 23 मे नंतर पुन्हा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी ते भेट केल्यास मी ते प्रेमाने स्वीकारेन. जीवनभर ते छायाचित्र सोबत बाळगणार असून कोणताच एफआयआर नोंदविणार नसल्याची उपरोधिक टिप्पणी मोदींनी केली आहे.