|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » स्वदेशी क्षेपणास्त्रांच्या निर्यातीची तयारी

स्वदेशी क्षेपणास्त्रांच्या निर्यातीची तयारी 

दक्षिणपूर्व आशिया, मध्यपूर्वेतील देशांना  निर्यात : शासकीय मंजुरीची प्रतीक्षा

वृत्तसंस्था/ सिंगापूर

 स्वदेशी क्षेपणास्त्रांच्या निर्यातीचे काम भारत यंदा सुरू करू शकतो. ही क्षेपणास्त्रs प्रामुख्याने दक्षिणपूर्व आशियाई तसेच मध्यपूर्वेतील देशांना विकली जाणार आहेत. सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या आयएमडीईएक्स आशिया एक्झिबिशन 2019 दरम्यान ब्राह्मोस एअरोस्पेसचे मुख्य महाव्यवस्थापक कमोडोर एसके. अय्यर यांनी ही माहिती दिली आहे. कंपनीने याबद्दलची तयारी पूर्ण केली असून आता केवळ शासकीय मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भारताची क्षेपणास्त्रs खरेदी करण्यास दक्षिणपूर्व आशियाई आणि आखाती देशांनी अधिक स्वारस्य दाखविले आहे. क्षेपणास्त्र विक्रीसाठी पहिली खेप तयार असून सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करत आहोत असे अय्यर म्हणाले.

भारतासाठी नामी संधी

भारताचे संरक्षण उत्पादक दक्षिणपूर्व आशियाई आणि आखाती देशांमध्ये स्वतःसाठी एक चांगली बाजारपेठ पाहत आहेत. हे सर्व मध्यम अर्थव्यवस्था असणारे देश आहेत. या देशांच्या स्वतःच्या गरजा असल्या तरीही ते अत्यंत महाग शस्त्रांची खरेदी करू शकत नाहीत. भारत त्यांना योग्य किमतीत क्षेपणास्त्रs उपलब्ध करू शकतो. ब्राह्मोसचा विकास भारत आणि रशियाने मिळून केला आहे. काही दक्षिण अमेरिकन देशांनीही भारताच्या क्षेपणास्त्रांमध्ये स्वारस्य दाखविले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कमी किंमत या बाबी याकरता कारणीभूत आहेत.

जागतिक शस्त्रप्रदर्शन

 सिंगापूरमध्ये मंगळवारपासून तीन दिवसीय प्रदर्शनास प्रारंभ झाला आहे. आयएमडीईएस आशिया एक्झिबिशन 2019 मध्ये जगाच्या एकूण 236 कंपन्यांनी भाग घेतला आहे. जगभरातील सुमारे 10500 कंपन्यांचे प्रतिनिधी सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. 30 देशांच्या 23 युद्धनौका प्रदर्शनात सामील करण्यात आल्या आहेत.