|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राहुल यांचे मोदींवर शरसंधान

राहुल यांचे मोदींवर शरसंधान 

वृत्तसंस्था/ बरगारी 

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंजाबमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. केवळ एक व्यक्ती देश चालवतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटते. पण प्रत्यक्षात लोक हा देश चालवत आहेत. एकेकाळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मोदी हे चेष्टा करायचे. पण आता 5 वर्षे पूर्ण झाल्यावर देश मोदींची चेष्टा करत असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.

धर्मग्रंथाचा अवमानाची घटना घडली असता मी पंजाबमध्ये आलो होतो. ज्यांनी हे गैरकृत्ये केले आहे, त्यांना शिक्षा मिळणारच असे आश्वासन देत असल्याचे राहुल म्हणाले. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका वड्रा यांनीही मंगळवारी धर्मग्रंथाच्या अवमानाप्रकरणी रालोआतील घटक पक्ष शिरोमणी अकाली दलावर जोरदार टीका केली होती.

राफेलच्या मुद्यावर मोदींनी माझ्यासोबत चर्चा करावी. मोदींच्या नोटाबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. लाखो लोकांना या निर्णयामुळे रोजगार गमवावा लागला आहे. प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपयांचे आश्वासन मोदींनी पाळले नाही. तसेच देशाच्या 1 कोटी लोकांना रोजगार देण्यास ते अपयशी ठरल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.