|Sunday, December 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गोव्याच्या राजकीय भवितव्याचा निकाल आठ दिवसांवर…

गोव्याच्या राजकीय भवितव्याचा निकाल आठ दिवसांवर… 

राजधानी पणजीत दि. 19 मे रोजी मतदान होत आहे. सत्ताधारी भाजपा सरकारबरोबरच विरोधी काँग्रेस पक्षासाठी एका अर्थाने ही वार्षिक परीक्षा म्हणावी लागेल. विधानसभेच्या चारही जागांवर राज्यातील पुढील राजकीय गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे हा निकाल सरकारच्या स्थिरतेबाबत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येत्या दि. 23 मे रोजी होणाऱया लोकसभा निवडणुकीच्या निकालापेक्षा गोमंतकीय जनतेला अधिक उत्सुकता लागून राहिली आहे, ती चार विधानसभा मतदारसंघातील पेटनिवडणुकीच्या निकालांची. दक्षिण गोव्यातील शिरोडा व उत्तर गोव्यातील मांद्रे व म्हापसा या तीन मतदारसंघांमध्ये दि. 23 एप्रिल रोजी मतदान झाले. राजधानी पणजीत दि. 19 मे रोजी मतदान होत आहे. सत्ताधारी भाजपा सरकारबरोबरच विरोधी काँग्रेस पक्षासाठी एका अर्थाने ही वार्षिक परीक्षा म्हणावी लागेल. या चारही जागांवर राज्यातील पुढील राजकीय गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे हा निकाल सरकारच्या स्थिरतेबाबत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पणजी मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पण त्याचे शिलेदार असलेले माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज हयात नाहीत. त्यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. सन 1994 पासून 2017 पर्यंत पणजीकरांनी सतत पर्रीकरांना निवडून दिले. मध्यंतरी 2014 मध्ये पर्रीकर केंद्रीय संरक्षणमंत्री बनल्यानंतर सिद्धार्थ कुंकळकर हे आमदार बनले पण पर्रीकरांचा प्रभाव कायम होता. आता पर्रीकरांविना पहिल्यांदाच भाजप पणजीचा गड लढवित आहे. पर्रीकरांच्या सहानुभूतीवर त्यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपची उमेदवारी देण्याचे चालले होते मात्र ऐनवेळी सिद्धार्थ कुंकळकर यांना उमेदवारी जाहीर झाली. आता सिद्धार्थ यांचा थेट सामना शेजारील ताळगाव मतदारसंघाचे माजी आमदार व पणजी महापालिकेवर वर्चस्व असलेले काँग्रेस उमेदवार बाबूश मोन्सेरात यांच्याशी आहे. बाबूशना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने भाजपसमोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा ठाकला आहे. त्यातच एकेकाळी भाजपाचे शिलेदार असलेले सुभाष वेलिंगकर हे गोवा सुरक्षा मंचतर्फे रिंगणात उतरल्याने भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुसऱया बाजूने ऐन निवडणुकीच्यावेळी मोन्सेरात यांच्यावरील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचे कथित प्रकरण पुढे आल्याने व न्यायालयाने याप्रकरणी येत्या 3 जून रोजी सुनावणी ठेवल्याने काँग्रेसही कोंडीत सापडली आहे. सध्या पणजीच्या प्रचारामध्ये भाजपाकडून बाबूशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा मुद्दा तर काँग्रेसने स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये भाजपच्या उमेदवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. गोसुमंतर्फे सुभाष वेलिंगकर व आम आदमी पक्षातर्फे वाल्मिकी नाईक हे रिंगणात असले तरी लढत थेट काँग्रेस-भाजपमध्येच आहे.

पणजीची जागा जिंकणे हे भाजपसाठी प्रतिष्ठेचे बनले असून पर्रीकरांनंतर मुख्यमंत्री बनलेले डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड व प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर प्रचारात जातीने लक्ष घालत आहेत. एकूण 22 हजार मतदारांपैकी अल्पसंख्याक म्हणजेच ख्रिस्ती मतदारांची टक्केवारी साधारण पंचवीस टक्के आहे. ही मते कुणाच्या बाजूने वळतील, यावरही भाजप व काँग्रेसने रणनीतीची समीकरणे बांधली आहेत. गेली तीस वर्षे पणजीतील मतदारांनी पर्रीकरांशिवाय इतर कुणाचा विचार केला नाही. यावेळी ते भाजपाच्या बाजूने राहतील की, अन्य पर्याय शोधतील यावर सत्ताधारी भाजपचे भवितव्य अवलंबून आहे. कारण ज्या पणजीमधून पर्रीकर सतत तीस वर्षे विजयी झाले, त्याच पणजीने राज्याला व भाजपला सक्षम नेतृत्त्व दिले. पर्रीकरांच्या नेतृत्त्वाखालीच भाजपचा राज्यात विस्तार झाला व सत्ताधारी पक्ष म्हणून उदयाला आला. पर्रीकरांची सहानुभूती किंवा पुण्याई भाजपच्या कामी येईल काय असे प्रश्नही आता उपस्थित होऊ लागले आहेत.

चाळीस आमदारांच्या गोवा विधानसभेत भाजपा व काँग्रेसचे प्रत्येकी 14 उमेदवार आहेत. म.गो. पक्षाचे दोन आमदार फोडल्यानंतर या घटक पक्षाने भाजपची साथ सोडली. शिवाय सरकार पाडण्याचे संकेतही दिले आहेत. सध्या गोवा फॉरवर्डचे तीन व तीन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार उभे आहे. त्यात म.गो. पक्षातून फुटून गेलेले उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिरोडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपच्या सुभाष शिरोडकर यांच्याविरोधात म.गो. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी निवडणूक लढविली आहे. शिरोडय़ासह मांद्रे, म्हापसा व पणजी या चार पोटनिवडणुकांचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. त्यात भाजपाने सर्व चार जागांवर बाजी मारल्यास सरकारवरील अस्थिरतेचे सावट दूर होईल मात्र निकाल विरोधकांच्या बाजूने लागल्यास सरकार अल्पमतात येईल. त्यामुळे पुन्हा फाटाफुटीच्या राजकारणाला गती मिळण्याची शक्यता आहे. केंद्रात कुठला पक्ष सत्तेवर येईल, हेही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

निकाल अवघ्या आठ दिवसांवर येऊन पोहोचला आहे. वाढत्या तापमानाबरोबर लोकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. चार जागांवरील या पोटनिवडणुकांनी काँग्रेसला सत्तेची दारे किलकिली केली आहेत. 23 मेच्या या निकालावर काँग्रेसबरोबरच भाजपचे पुढील भवितव्य अवलंबून आहे. मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळतानाच भाजपमध्ये डॉ. प्रमोद सावंत यांच्याही नेतृत्त्वाची ही सत्त्वपरीक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्याच्या राजकीय भवितव्याच्यादृष्टीनेही हा निकाल तेवढाच निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी अजून आठ दिवस वाट पहावी लागेल.

सदानंद सतरकर

Related posts: