|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रेल्वे प्रवाशांनो कृपया लक्ष द्या!

रेल्वे प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! 

नवी दिल्ली

 उन्हाळय़ाच्या सुटय़ांमध्ये रेल्वेमधून प्रवास करण्याची योजना आखत असल्यास तुमच्यासाठी हे वृत्त अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रवास आरामदायी करण्यासाठी रेल्वेने अनेक सेवा सुरू केल्या आहेत. या सेवांमध्ये डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म सर्व्हिसचा समावेश झाला आहे. प्रवाशाला त्याचे इच्छित स्थानक आल्यावर रेल्वे फोन करून किंवा एसएमएस पाठवून जागं करणार आहे. या सेवेमुळे प्रवासादरम्यान झोपेत असल्याने स्थानकावर उतरू न शकल्याची समस्या उद्भवणार नाही.

यानुसार अर्ध्या तासापूर्वी फोन करून प्रवाशाला स्थानकाबद्दल कळविले जाणार आहे. चौकशी सेवेवर आयव्हीआरशी या सुविधेला जोडून अलार्म सेवा सुरू करण्यात आली आहे. ग्राहकसेवा प्रतिनिधीशी 139 क्रमांकावर संपर्क साधून ही सुविधा प्राप्त करता येणार आहे. डेस्टिनेशन अलर्ट सक्रीय करण्यासाठी प्रवाशाला स्वतःच्या मोबाईलवरून 139 क्रमाकांवर कॉल किंवा एसएमएस करावा लागणार आहे. कॉल स्वीकारला गेल्यावर सर्वप्रथम भाषेची निवड करावी लागेल. त्यानंतर डेस्टिनेशन अलर्टसाठी 7 क्रमांक आणि नंतर 2 क्रमांकाचा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर 10 अंकांचा पीएनआर क्रमांक नमूद करावा लागणार आहे.

पीएनआर क्रमांकाचे प्रमाणन केल्यावर डेस्टिनेशन स्थानकासाठी अलर्ट सुविधा सुरू होणार आहे. या प्रक्रियेनंतर सेवेच्या पुष्टीचा एसएमएस प्राप्त होईल. इच्छित स्थानक येण्यापूर्वी मोबाईलवर कॉल येणार आहे. प्रति अलर्ट एसएमसकरता 3 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कॉलसाठी देखील अशाचप्रकारे शुल्क अदा करावे लागणार आहे.