|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इराणने मार्ग रोखल्यास जगभरात हाहाकार

इराणने मार्ग रोखल्यास जगभरात हाहाकार 

कच्च्या तेलाचा पुरवठा होणार खंडित : होर्मूझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद करण्याचा इशारा, भारतावरही परिणाम होणार

वृत्तसंस्था/ तेहरान 

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत चालला असून सौदी अरेबियाने स्वतःच्या दोन तेलवाहू टँकर्सवर हल्ला झाल्याचा दावा केला आहे. पण इराणने हल्ल्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये यापूर्वी तणाव वाढला असता आखातात गंभीर परिणाम दिसून आले असून त्याचा प्रभाव पूर्ण जगावर पडला आहे. सैन्य तणाव वाढल्यास  कच्च्या तेलाची धमनी म्हणून ओळखली जाणारी होर्मूझ सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा इराणने वारंवार दिला आहे.

होर्मूझ सामुद्रधुनीचा मार्ग जागतिक तेल व्यापारावर प्रभाव पाडणारा आहे. इराणने होर्मूझ सामुद्रधुनीचा मार्ग रोखल्यास तेलासाठी जगभरात हाहाकार माजू शकतो. सौदी अरेबिया, इराक, युएई, कुवेत, कतार आणि इराणच्या बहुतांश तेलाची निर्यात होर्मूझ सामुद्रधुनीद्वारेच होते. तेथून किमान 15 दशलक्ष बॅरल्स प्रतिदिन तेलाचा पुरवठा होतो. हा मार्ग बंद झाल्यास अनेक देशांमध्ये कच्च्या तेलाची टंचाई निर्माण होईल तसेच त्याचे दर वाढतील. यातून आखाती देशांची स्थिती बिघडून संघर्ष उद्भवू शकतो.

अर्थव्यवस्थेला हानिकारक

सद्यस्थिती आणखी एका आखाती युद्धाच्या दिशेने इशारा करत असल्याचे जाणकारांचे मानणे आहे. हे युद्ध झाल्यास भारत आणि चीनकरता अडचणी उभ्या राहू शकतात. इराणकडून तेल आयातीवर देण्यात आलेली सूट अमेरिकेने मागे घेतल्याने भारत त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. भारत-चीन समवेत अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये सध्या मरगळ दिसून येतेय, अशा स्थितीत जागतिक तेल व्यापारातील कुठल्याही प्रकारचा अडथळा जागतिक अर्थव्यवस्थेकरता हानिकारकच ठरणार आहे.

80 च्या दशकातील टँकरवॉर

1980 अन् 1988 मध्ये इराण-इराक युद्धावेळी दोन्ही देशांनी परस्परांच्या तेल निर्यातीला लक्ष्य केले होते. या संघर्षाला तेव्हा टँकरवॉर हे नाव पडले होते आणि तेव्हाही होर्मूझ सामुद्रधूनीतील तेल व्यापारच प्रभावित झाला होता. अमेरिकेने  युएस फिफ्थ फ्लीट (युद्धनौकांचा ताफा) व्यापारी जहाजांच्या सुरक्षेकरता उतरविले होते. होर्मूझ सामुद्रधुनीतील तेलवाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी फिफ्थ फ्लीटकडेच होती. अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर इराणने आण्विक कार्यक्रमाला हात घातला होता.

पहिली वेळ नसणार

होर्मूझ सामुद्रधुनीतील संघर्षाची ही पहिलीच वेळ ठरणार नाही. यापूर्वी 1988 मध्ये अमेरिकेच्या युद्धनौकांनी इराणचे एक प्रवासी विमान नष्ट केले होते, ज्यात 290 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला अमेरिकेने दुर्घटना ठरवत चूक मान्य केली होती. पण इराणने याला जाणूनबुजून केलेला हल्ला ठरविले होते. दोन्ही देशांदरम्यान या घटनेवरून तणाव शिगेला पोहोचला होता.