|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा धुव्वा

चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा धुव्वा 

मालिकेतील पहिला पराभव, गोव्हर्स-हेवर्डचे प्रत्येकी 2 गोल

वृत्तसंस्था/ पर्थ

जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानावर असणाऱया ऑस्ट्रेलियाने हॉकी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. यजमान संघातर्फे ब्लेक गोव्हर्स व जेरेमी हेवर्ड यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदवले.

या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत भारतीय संघ अपराजित राहिला होता. पण चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला चांगला धडा देत पराभूत केले. गोव्हर्सने 15 व 60 व्या मिनिटाला तर हेवर्डने 20 व 59 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाचे गोल नोंदवले.

भारताने सुरुवात चांगली केली आणि यजमानावर दडपण आणले होते. पण नंतर केवळ पाच मिनिटात दोनदा ऑस्ट्रेलियाने भारताला धक्के दिले. पाचव्या मिनिटाला भारताने सर्वप्रथम पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण हरमनप्रीत सिंगचा फटका पुढे धावत आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने यशस्वीरित्या अडवित भारताला हा प्रयत्न फोल ठरविला. 12 व्या मिनिटाला हरमनप्रीतने निलकांता शर्माच्या साथीने उजव्या बगलेतून आक्रमण केले. आगेकूच करणाऱया निलकांतने पुन्हा चेंडू हरमनप्रीतकडे चेंडू दिला. पण हरमनप्रीत चेंडूपर्यंत वेळेत पोहोचू शकला नाही. पहिले सत्र संपण्याच्या सुमारास ऑस्ट्रेलियाने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला. त्याचे नंतर पेनल्टी स्ट्रोकमध्ये रूपांतर झाले. त्यावर गोव्हर्सने अचूक गोल नोंदवत यजमानाला आघाडी मिळवून दिली.

दुसऱया सत्रातील पाचव्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने पाठोपाठ पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. त्यातील दुसऱया कॉर्नरवर हेवर्डने फ्लिक करीत अचूक गोल नोंदवला. तीनच मिनिटानंतर भारतीय गोलरक्षक कृशन बहादूर पाठकने अप्रतिम गोलरक्षण करीत ऑस्ट्रेलियाचा एक पेनल्टी कॉर्नर वाया घालविला. 25 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या ऍरोन क्लीनश्मीटने एक सुवर्णसंधी वाया घालविली. बॉक्समध्ये त्याला कोणीही त्याला मार्किंग केले नव्हते. पण त्याने मारलेला फटका गोलपोस्टच्या खूप बाजूने दूर गेला.

बॉल पझेशनसाठी झगडणाऱया भारताला सुमित कुमारने पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. मात्र ऑस्ट्रेलियन गोलरक्षक जोहान डर्स्टने दुहेरी बचाव करीत हरमनप्रीतचा प्रयत्न फोल ठरविला. दुसऱया सत्राच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाला पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळाला. ट्रेंट मिटनने मारलेला जोरदार फटका पाठकने उजवीकडे झेपावत अचूक अडविला. मध्यंतराला ऑस्ट्रेलियाला 2-0 आघाडीवरच समाधान मानावे लागले. तिसऱया सत्रात मात्र दोन्ही संघांत जोरदार चुरस पहावयास मिळाली.  मात्र ऑस्ट्रेलियाने भक्कम बचाव करीत भारताला गोलची संधी मिळू दिली नाही. शेवटच्या सत्रातही भारताने चांगली सुरुवात केली होती. 51 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी मिळाली. पण यावेळीही हरमनप्रीतचा फटका डर्स्टने अचूक अडविला. गोलसाठी धडपडणाऱया भारताने गोलरक्षकाला बाजूला करीत आऊटफील्डमध्ये खेळविले. पण ही चाल भारतालाच अंगलट आली. कारण शेवटच्या दोन मिनिटात ऑस्ट्रेलियाने दोन गोल नोंदवून भारताचा मोठा पराभव निश्चित केला. तिसरा गोल पेनल्टी कॉर्नरवर हेवर्डने तर चौथा गोल गोव्हर्सने नोंदवला. शुक्रवारी या मालिकेतील पाचवा व शेवटचा सामना होणार आहे.