|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » क्रोएशियाचे इगोर भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक

क्रोएशियाचे इगोर भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक 

इगोर यांच्याशी दोन वर्षांचा करार, अखिल भारतीय फुटबॉल संघटनेची महत्त्वपूर्ण घोषणा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

क्रोएशियाचे माजी वर्ल्डकप फुटबॉलपटू इगोर स्टीमाक यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली गेली आहे. इगोर हे पुढील दोन वर्षांसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक असतील. यापूर्वी जानेवारी महिन्यात स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपद रिक्तच होते. इगोर स्टीमाक यांच्या नियुक्तीचा निर्णय अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या व्यवस्थापकीय समितीने घेतला.

51 वर्षीय इगोर हे 1998 विश्वचषक स्पर्धेत खेळले असून क्रोएशियाने त्यावेळी तिसऱया क्रमांकापर्यंत झेप घेतली होती. ही स्पर्धा फ्रान्समध्ये झाली होती. स्टीमाक यांना 18 वर्षे प्रशिक्षणाचा उत्तम अनुभव असून प्रशिक्षण, फेररचना, फुटबॉल रुजवणे आणि खेळाडूंना मायदेशात व विदेशात खेळण्यासाठी स्वतंत्ररित्या तयार करणे, यात त्यांचा हातखंडा आहे.

प्रशिक्षक नात्यानेही उत्तम अनुभव

ब्राझीलमध्ये संपन्न झालेल्या 2014 फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियाला पात्रता प्राप्त करुन दिली, ही प्रशिक्षक या नात्याने इगोर यांची सर्वात लक्षवेधी कामगिरी ठरली. क्रोएशियाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी मॅटेओ कोव्हासिक, ऍन्टे रेबिक, ऍलेन हॅलिलोव्हिक व इव्हान पेरिसिक यांना पदार्पणाची संधी दिली.

कारकिर्दीला दिशा देण्यातही अग्रेसर

डॅरिओ स्रॅना, डॅनिएल सुबॅसिक, इव्हान स्त्रिनिक, कोव्हासिक, पेरिसिक यांच्यासह अन्य खेळाडूंच्या कारकिर्दीला नवी दिशा देण्यातही त्यांनी मोलाचा वाटा उचलला. आपल्या उमेदीच्या कालावधीत त्यांनी क्रोएशियन राष्ट्रीय संघातर्फे 53 वेळा प्रतिनिधीत्व केले. यापूर्वी कतारमधील अल-शाहानिया संघाला प्रशिक्षण दिले, हा त्यांचा मागील अनुभव आहे. खेळाडू या नात्याने ते 1998 विश्वचषकात तिसऱया स्थानी झेप घेणाऱया क्रोएशियन संघाचे खेळाडू तर राहिलेच. याशिवाय, इंग्लंडमध्ये 1996 साली संपन्न झालेल्या युरो चषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलेल्या  राष्ट्रीय संघातही त्यांचा समावेश राहिला.

युगोस्लाव्हियातर्फे जेतेपदात सहभाग

याशिवाय, 1987 साली फिफा 20 वर्षाखालील वयोगटातील विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱया युगोस्लाव्हिया 19 वर्षाखालील राष्ट्रीय संघातही त्यांचा समावेश राहिला. इगोर यांचे भारतीय फुटबॉलमध्ये स्वागत करताना अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले की, ‘भारतीय संघाला प्रशिक्षण देण्यासाठी इगोर हेच सर्वोत्तम आहेत. भारतीय फुटबॉल सध्या संक्रमणातून जात आहे आणि त्यांचा प्रचंड अनुभव संघासाठी अतिशय मार्गदर्शक व उपयुक्त ठरेल, याची मला खात्री वाटते’.

महासचिव दास यांच्याकडून स्वागत

इगोर यांच्यामुळे भारतीय संघाला अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल, असा होरा फेडरेशनचे महासचिव कुशल दास यांनी व्यक्त केला. इगोर यांचा खेळाडू व प्रशिक्षक या दोन्ही नात्यांनी असणारा अनुभव दांडगा आहे. भारतीय फुटबॉलची त्यांच्या प्रशिक्षणाखाली निश्चितच जोरदार प्रगती होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तांत्रिक समितीचे प्रमुख व माजी भारतीय फुटबॉलपटू शाम थापा यांनीही इगोर यांची निवड एकमताने झाल्याचे यावेळी नमूद केले.

‘तांत्रिक समितीचे सर्व सदस्य आणि एआयएफएफ तांत्रिक संचालक इसाक दोरु यांच्यासह सर्वच जणांमध्ये इगोर यांना नियुक्त करण्यासाठी एकवाक्यता होती. इगोर यांनी विश्वचषक स्पर्धा खेळली आहे आणि प्रशिक्षक या नात्याने त्यांनी क्रोएशियाला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रताही संपादन करुन दिली आहे. त्यामुळे, त्यांच्यासारखा दुसरा सर्वोत्तम प्रशिक्षक असूच शकत नाही’, असे थापा याप्रसंगी म्हणाले. इगोर स्टीमाक भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी रुजू झाल्यानंतर बुरिराम, थायलंड येथे होणाऱया किंग्स कप स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची मोहीम सुरु होईल. तेथे भारतीय संघ कुराकाओविरुद्ध दि. 5 जून रोजी आपला पहिला सामना खेळणार आहे.