|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंडचा पाकवर दणदणीत विजय

इंग्लंडचा पाकवर दणदणीत विजय 

सामनावीर बेअरस्टोचे शानदार शतक, वोक्सचे 4 बळी

वृत्तसंस्था/ ब्रिस्टॉल, इंग्लंड

शतनकवीर जॉनी बेअरस्टो व अर्धतकवीर जेसन रॉयसमवेत त्याने केलेली दीडशतकी सलामीच्या बळावर इंग्लंडने येथे झालेल्या तिसऱया वनडे सामन्यात पाकवर 6 गडय़ांनी विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. 93 चेंडूत 128 धावा फटकावणाऱया बेअरस्टोला सामनावीराचा बहुमान मिळाला. पाकचा सलामीवीर इमाम उल हकचे शतक मात्र वाया गेले.

हाय स्कोअरिंगच्या या सामन्यात इंग्लंडने मोठय़ा धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याची आणि मोठय़ा धावसंख्येचे आव्हान देण्याची क्षमता आपल्यात असल्याचे दाखवून दिले आहे. सर्वसाधारणपणे इंग्लंड नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेते. पण पाठलाग करण्याचा अनुभव खेळाडूंना मिळावा या उद्देशाने कर्णधार मॉर्गनने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकने प्रथम खेळून 50 षटकांत 9 बाद 358 धावांचा डोंगर उभारला. त्यात इमाम उल हकच्या 151 धावांचा समावेश होता. त्याची ही कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यानंतर इंग्लंडने 44.5 षटकांत 4 बाद 359 धावा जमवित सामना जिंकला. यापैकी 128 धावा बेअरस्टोने काढल्या. कसोटी कर्णधा ज्यो रूटने 43 धावा केल्या.

शनिवारी झालेल्या दुसऱया सामन्यात नाबाद 110 धावांची खेळी करून इंग्लंडला विजय मिळवून दिलेल्या जोस बटलरला या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे मोठय़ा धावसंख्येच्या आव्हान त्यांना पेलणे कठीण जाणार होते. पण बेअरस्टो व त्याचा सलामीचा साथीदार रॉय यांनी केवळ 18 षटकांत 159 धावांची धडाकेबाज भागीदारी करीत इंग्लंडला भक्कम पाया रचून दिला. रॉयने 55 चेंडूत 76 धावांचे योगदान दिले. त्याला शाहीन आफ्रिदीने 21 धावांवर जीवदानही दिले होते. या जोडीने फलंदाजीस अनुकूल खेळपट्टी, आखुड सीमारेषा, वेगवान आऊटफील्ड आणि अननुभवी पाकिस्तानी आक्रमण यांचा पुरेपूर लाभ घेत चौकार-षटकारांचा रतीब सुरू केला. रॉयला असिफ अलीने बाद करून ही जोडी फोडली. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार, 4 षटकार मारले. बेअरस्टोही लगेचच बाद झाला असता. पण फहीमला त्याचा कठीण झेल टिपता आला नाही. यावेळी तो 86 धावांवर होता. बेअरस्टोने नंतर सातवे व पाकविरुद्धचे पहिले वनडे शतक 74 चेंडूत पूर्ण केले. त्यात 12 चौकार, 3 षटकारांचा समावेश होता. जुनेद खानने त्याला त्रिफळाचीत करून त्याची खेळी संपुष्टात आणली. नंतर बेन स्टोक्स (38 चेंडूत 37), मोईन अली (36 चेंडूत नाबाद 46) व इयॉन मॉर्गन (12 चेंडूत नाबाद 17) यांनी 45 व्या षटकात संघाचा विजय साकार केला.

तत्पूर्वी, ख्र्रिस वोक्सने 67 धावांत 4 बळी मिळवित इंग्लंडच्या विश्वचषक संघात स्थान मिळविण्याच्या दाव्याला आणखी बळकटी दिली. आदिल रशिदच्या जागी घेतलेल्या ज्यो डेन्लीला मात्र आपला प्रभाव पाडता आला नाही. त्याला एकच षटक देण्यात आले. त्यात त्याने 9 धावा दिल्या. त्याला नंतर गोलंदाजी देण्यात आली नाही. वोक्सने पाकची स्थिती 2 बाद 27 अशी केली होती. त्याने फखर झमान (2) व नंतर बाबर आझम (15) यांना बाद केले. पण हॅरिस सोहेलने (41 चेंडूत 41) इमाम उल हकसमवेत अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला. इमामने 27 व्या वनडेत आपले सहावे शतक व इंग्लंडविरुद्धचे पहिले शतक 97 चेंडूत पूर्ण केले. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध नोंदवलेली 128 सर्वोच्च खेळीही मागे टाकली. करनने त्याचा त्रिफळा उडवित त्याची खेळी संपुष्टात आणली. त्याने 131 चेंडूत 16 चौकार, 1 षटकारासह 151 धावा फटकावल्या. पण संघाला त्या यश मिळवून देऊ शकल्या नाहीत. पाकच्या फलंदाजाने इंग्लंडविरुद्ध नोंदवलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. याआधी फखर झमानने 138 धावा जमविल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान 50 षटकांत 9 बाद 358 : इमाम उल हक 151 (131 चेंडूत 16 चौकार, 1 षटकार), बाबर आझम 15, हॅरिस सोहेल 41 (41 चेंडूत 7 चौकार), सर्फराज अहमद 27 (34 चेंडूत 2 चौकार), असिफ अली 52 (43 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), इमाद वासिम 22 (12 चेंडूत 4 चौकार), फहीम अश्रफ 13, शाहीन आफ्रिदी 7, हसन अली नाबाद 18 (9 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), अवांतर 10. गोलंदाजी : वोक्स 4-67, विली 1-86, करन 2-74.

इंग्लंड 44.5 षटकांत 5 बाद 359 : जेसन रॉय 76 (55 चेंडूत 8 चौकार, 4 षटकार), बेअरस्टो 128 (93 चेंडूत 15 चौकार, 5 षटकार), रूट 43 (36 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), स्टोक्स 37 (38 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), मोईन अली नाबाद 46 (36 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), मॉर्गन नाबाद 17 (12 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांतर 12. गोलंदाजी : जुनेद खान 1-57, इमाद वासिम 1-58, फहीम अश्रफ 1-75.