|Sunday, May 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » 50 हजारांची लाच घेणाऱया वकिलास अटक

50 हजारांची लाच घेणाऱया वकिलास अटक 

निकाल बाजूने लावण्यासाठी पक्षकाराकडून मागितली होती लाच, वकील वर्गात उडाली खळबळ

प्रतिनिधी/ सातारा

ग्राहक न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याच्या अनुषंगाने न्यायालयातील न्यायाधिशांनी खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लावण्यासाठी पैसे मागितले आहेत, असे सांगून पक्षकाराकडून 50 हजारांची लाच स्वीकारताना ऍड. शिवराज पाटील यांना सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दरम्यान, या घटनेमुळे न्यायालयीन परिसरासह वकील वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार यांचा सातारा येथील ग्राहक न्यायालयात खटला सुरु आहे. ऍड. शिवराज मारुती पाटील (वय 30, मूळ रा. निगडी, ता. कराड) हे तक्रारदार पक्षकाराचे वकील आहेत. ऍड. शिवराज पाटील यांनी तक्रारदाराला निकाल तुमच्या बाजूने लावायचा असेल तर न्यायालयाने सुमारे 1 लाख 70 हजार रुपये मागितले आहेत, असे सांगितले. परंतु तक्रारदाराला संशय आल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार सातारा लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

 तक्रार दाखल झाल्यानंतर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 26 एप्रिल रोजी याबाबत पडताळणी केली. या पडताळणीमध्ये संबंधित वकिलाने पैशाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचेची रक्कम बुधवार 15 मे रोजी घेण्याचे ठरले होते. त्यानुसार सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सकाळपासूनच सातारा येथील ग्राहक न्यायालयात सापळा रचला होता. लाचेची रक्कम ग्राहक न्यायालयाच्या बाहेरच स्वीकारताना ऍड. शिवराज पाटील यांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती.

याप्रकरणी संशयित वकिलावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, पोलीस हवालदार राजे, सपकाळ, ताटे, कर्णे यांनी सहभाग घेतला….

Related posts: